इतर प्रवासी वाहनांकडून वसुली; सरकारची खासगी कंपनीवर मेहरनजर

प्रदूषणावर आळा घालण्याच्या नावावर उपराजधानीत सुरू होणाऱ्या ओला कंपनीच्या ऑनलाईन ‘ई-टॅक्सी’ला वर्ष २०१२ मधील कायद्याचा आधार घेत रस्ते करातून (रोड टॅक्स) सूट देण्यात आली आहे, तर ऑटोरिक्षा आणि इतर प्रवासी वाहनांकडून मात्र तो वसूल केला जात आहे. यावरून सरकारची खासगी कंपनीवर विशेष मेहरनजर असल्याचे चित्र आहे.

मुंबई मोटार वाहन कायद्यानुसार प्रत्येक प्रवासी ऑटोरिक्षांना प्रत्येक वर्षी रोड टॅक्स म्हणून सुमारे ३०० रुपये, तर परवाना शुल्क म्हणून सुमारे २०० रुपये परिवहन कार्यालयात जमा करावे लागते. ऑल इंडिया परमिट चारचाकी वाहनांच्या बाबतीत वातानुकूलित वाहनांना प्रती प्रवासी २ हजार रुपये तर विना वातानुकूलित वाहनांना हा कर प्रती प्रवासी १ हजारांच्या जवळपास असतो. काळी-पिवळी टॅक्सीसाठी ७ हजार ५०० रुपये एकाच वेळी भरावे लागते. मात्र, शहरात नव्याने सुरू होणाऱ्या ‘ई-टॅक्सी’चा व्यवसाय करणाऱ्या ‘ओला’ सारख्या मोठय़ा कंपनीकडूनही सरकारने मोठय़ा स्वरूपात रोड टॅक्स घेणे अपेक्षित आहे, परंतु २०१२ मधील बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांकरिता असलेल्या कायद्याचा आधार घेत या सर्व वाहनांवरील रोड टॅक्समधून ओला कंपनीला सूट देण्यात आली आहे. शासनाचा जुना कायदा झाला त्यावेळी प्रदूषण नियंत्रणाकरिता बॅटरी कारबाबत हा निर्णय होता. त्यावेळी एकही व्यावसायिक संवर्गातील वाहने बॅटरीवर धावत नव्हती. खासगी वाहनांसह काही दुचाकी वाहने बॅटरीवर धावत होत्या. तेव्हा शासनाने नागपूरला चालू होणाऱ्या ई-टॅक्सीचा परवाना देताना रोड टॅक्स म्हणून तातडीने धोरणात्मक निर्णयावर विचार करणे आवश्यक होते, परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे शहरातील ऑटोरिक्षांसह विविध प्रवासी वाहने चालवणाऱ्या वाहन चालकांच्या संघटना संतापल्या आहे. शहरात पहिल्या टप्प्यात २६ मे २०१७ पासून सुमारे २०० ई-रिक्षा धावणार आहे, हे विशेष.

‘ई-टॅक्सी’ला हिरवा कंदील

देशातील पहिल्या ‘ई-टॅक्सी’ला प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, नागपूरने हिरवा कंदील दिला आहे. शहर व जिल्ह्य़ात प्रोव्हेंशियल ऑटोमोबाईल कंपनी प्रायव्हेट लिमिटेड नागपूर व ओला फ्लिट टेक्नोलॉजिस्ट प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या कंपनीकडून महिंद्रा कंपनीची ‘ई-२ ओ’ मॉडेलचे शंभर वाहने पहिल्या टप्प्यात रस्त्यांवर धावतील. मोबाईल अ‍ॅपवर आधारित मीटर कॅब पद्धतीच्या सेवेत प्रवाशांकडून सुरवातीला ‘कुल-कॅब’च्या धर्तीवर प्रवास भाडे आकारले जाईल. या पांढरा आणि पिवळ्या रंगाच्या ई-टॅक्सीत वाहन चालकाचा फोटो, परवाना क्रमांक, बॅच क्रमांक तसेच वाहनाचा नोंदणी क्रमांक असेल. टॅक्सी निश्चित स्थानकावर पोहोचताच किती भाडे झाले याचा संदेश प्रवाशांच्या मोबाईलवर येईल. कॅबच्या आत प्रवाशांकरिता आरटीओचा मदत क्रमांक, महिलांसाठी पोलीस मदत क्रमांक नमूद असेल. भाडय़ाच्या देयकात प्रवास केलेला मार्ग, अंतर विविध कराचा तपशील दिलेला असेल. याची प्रत प्रवाशाच्या ई-मेलवरही येईल. प्रवास भाडय़ाचे बिल इलेक्ट्रॉनिक पद्धतीनेही करण्याची सुविधा राहील. ई- टॅक्सीकरिता पहिल्या किलोमीटरला भाडे १४ रुपये तर त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरकरिता ११ रुपये राहील. मंगळवारी झालेल्या बैठकीत वरील बाबी निश्चित झाल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी शरद जिचकार यांनी दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे होते.

[jwplayer 9xaU4cUi-1o30kmL6]

राज्यात प्रथमच नागपूरला महाराष्ट्र सिटी टॅक्सी नियम- २०१७ अनुसार ‘ई- टॅक्सी’ला परवाने दिल्या जात आहे. वर्ष २०१२ मधील एका नियमानुसार या वाहनातून प्रदूषण होत नसल्यामुळे त्यावर रोड टॅक्स आकारल्या जावू शकत नाही. परंतु परवाना शुल्कापोटी या वाहनांना पाच वर्षांकरिता सुमारे २५ हजार रुपये आकारले जाणार आहे. रोड टॅक्सबाबत परिवहन आयुक्त कार्यालयाकडून सल्ला घेऊन योग्य कार्यवाही केल्या जाईल. या वाहनांमुळे नागपूर शहराला प्रदूषणमुक्त ठेवण्याचे शासनाचे स्वप्न साकारण्यास मदत होणार आहे.

शरद जिचकार, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर (शहर)

 

शहरातील प्रवासी संवर्गातील वाहने

(३१ मार्च २०१७)

संवर्ग                                 संख्या

ऑटोरिक्षा                        १२,५६७

मीटर टॅक्सी                        १३

कुल-कॅब                            २८

टुरिस्ट टॅक्सी (एसी)         ४,९१४

टॅक्सी (नॉन एसी)            १,२०६

लक्झरी टॅक्सी                     १