‘महावितरण’च्या ग्राहक नोंदणीला प्रतिसाद
महावितरणच्या ग्राहक सुविधांचा लाभ घेण्यासाठी नागपूर व वर्धा जिल्ह्य़ांसह नागपूर परिमंडळातील ८६ हजार ९०७ वीज ग्राहकांनी स्वतच्या मोबाईल क्रमांकाची मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्र (सेंट्रलाईज कस्टमर केअर सेंटर) मध्ये नोंदणी केली आहे. त्यामुळे या ग्राहकांच्या मोबाईल व ई-मेलवर वीज बिल मिळणे सुरू झाले आहे. महावितरणच्या या ग्राहक सेवा केंद्रासोबतच अॅपआणि ‘एसएमएस’द्वारे नोंदणी करण्याची सोयही उपलब्ध झाली आहे.
महावितरणकडून विविध ग्राहकसेवांसह वीज ग्राहकांच्या मोबाईलवर मासिक वीजबिलाची माहिती सध्या प्रायोगिक तत्वावर एसएमएसद्वारे पाठविण्यात येत आहे. नागपूर परिमंडळातील मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या सर्वच वीज ग्राहकांना वीजबिलाचा ‘एसएमएस’ पाठविण्यात येत आहे. याशिवाय ई-मेलची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांना त्यावर वीजबिल पाठविण्यात येत आहे. महावितरणकडून वीज ग्राहकांना मोबाईल क्रमांक किंवा इमेलची नोंदणी करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यात महावितरणच्या ९२२५५९२२५५ या क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे वीज ग्राहकांना स्वतचा इमेल आयडी किंवा मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय आहे.
वीज ग्राहकांनी ९२२५५९२२५५ क्रमांकावर ‘एसएमएस’ केल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी होणार आहे. याशिवाय महावितरणच्या चोवीस तास सुरू असणाऱ्या कॉल सेंटरचे १८००२००३४३५ आणि १८००२३३३४३३५ हे दोन टोल फ्री क्रमांक उपलब्ध असून कोणत्याही कंपनीच्या मोबाईल किंवा दूरध्वनीद्वारे या दोन्ही क्रमांकावर संपर्क साधता येतो. भाषेची निवड केल्यानंतर सहा अंक दाबल्यानंतर कॉल सेंटरमधील ग्राहक प्रतिनिधीशी थेट संपर्क होतो. यानंतर वीजग्राहकांना स्वतच्या वीजग्राहक क्रमांकासोबत स्वतचे मोबाईल किंवा दूरध्वनी क्रमांक ग्राहक प्रतिनिधींना सांगून ते नोंदविण्याची सोय आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 17, 2016 2:09 am