• कुठे ओळखपत्र घेऊन तर कुठे थेट भरणा
  • नोटांचे क्रमांक लिहिण्याच्या सूचना

केंद्र सरकारने ५०० व १००० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्यावर महावितरण व ‘एसएनडीएल’च्या वीज बिल भरणा केंद्रांवर त्या स्वीकारल्या जात आहे. या केंद्रांनी परस्पर नियम तयार करून त्याची अंमलबजावणी सुरू केली असून त्याचा नागरिकांना फटका बसत आहे. नियमानुसार कुठे बिल भरताना ओळखपत्र घेण्यात येत असून, कुठे ते बघितलेही जात नाही. कुठे नोटांचे क्रमांक लिहून घेतले जात असून दुसरीकडे हा प्रकार दिसत नाही. तेव्हा काही लोकांना हा त्रास का दिला जातो, असा प्रश्न नागरिक विचारत आहे.

शहरात ७० टक्क्यांहून जास्त भाग ‘एसएनडीएल’कडे तर इतर भाग महावितरणच्या कार्यक्षेत्रात येतो. जुन्या नोटा बाद करण्याचा निर्णय झाल्यानंतर शासनाने परवानगी देत काही अटी व शर्थीचे पालन करण्याच्या सूचना केल्या. सगळ्या वीज बिल भरणा केंद्रांवर त्याची एक समान अंमलबजावणी अपेक्षित आहे.

विविध ठिकाणी विविध नियम दाखवत ग्राहकांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप केला जात आहे. ग्राहकांनी दिलेल्या माहितीनुसार महावितरणच्या रामनगर येथे बऱ्याच ग्राहकांना सुटे पैसे नसल्याचे सांगत ७०० रुपयांचे बिल असल्यास १००० रुपये किंवा ५०० रुपयांच्या जुन्या नोटा असल्यास दोन नोटा म्हणजेच एकूण १००० रुपये स्वीकारले गेले. त्यातील शिल्लक ३०० रुपये पुढच्या बिलामध्ये जमा केले जाईल, असे सांगण्यात येत आहे. येथे ओळखपत्र बघितले गेले नाही. या प्रकाराने बिल भरल्यानंतर उरलेली सुटी रक्कम न मिळाल्याने ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागला. सावरकर नगर चौकातील महावितरणच्या केंद्रावरही असाच अनुभव ग्राहकांना आला.

या केंद्रात ५०० रुपयांची नोट खरी असल्याचे मशीनमध्ये तपासण्यातही आले. सक्करदरा चौकातील एसएनडीएलच्या भरणा केंद्रात ओळखपत्राची छायांकित प्रत घेतल्याशिवाय वीज बिले स्वीकारण्यात आली नाहीत, तर तुळशीबाग केंद्रात ग्राहकांकडील ५०० व १००० रुपयांच्या नोटांचे क्रमांकही लिहून घेण्यात आले. या प्रकाराने येथे ग्राहकांचा वेळ नाहक वाया गेला. तुकडोजी पुतळा कार्यालयातही शासनाच्या निर्णयानंतर दुसऱ्या दिवशी बराच कालावधी या नोटा स्वीकारण्यात न येण्यासह तशा सूचनेचा फलक लावण्यात आल्याची माहिती ग्राहकांनी दिली. सगळ्याच भरणा केंद्राचा गोंधळ बघता त्यात एकसूत्रता कधी येणार? हा प्रश्न विचारला जात आहे.

‘महावितरण’कडून शहरातील सगळ्याच वीज भरणा केंद्रांना एकसमान सूचना केल्या गेल्या आहेत. काहींचा गैरसमज झाल्याने काही ठिकाणी समस्या निर्माण झाल्याचे नाकारता येत नाही. महावितरणच्या मुख्य अभियंत्यांपासून कोणत्याही अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कानावर त्या गेल्यास त्या तातडीने सोडवल्या जात आहे. वीज ग्राहकांना कोणताही त्रास झाल्यास त्यांनी त्वरित महावितरणच्या १८००२३३३४३५ किंवा १८००२००३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, त्यांना त्वरित मदत केली जाईल.

योगेश विटणकर, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी, नागपूर