News Flash

वीज चोरांविरुद्ध कठोर पाऊल

वीज चोरी करताना प्रामुख्याने मीटरमध्ये बिघाड केला जातो.

  • सार्वजनिक मालमत्तेला हानी पोहोचल्याचा गुन्हा
  • शहरात कारवाई सुरू

वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांच्या विरोधात आता सार्वजनिक मालमत्तेला बाधा पोहोचविण्याचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. अशा प्रकारच्या काही गुन्ह्य़ांची नोंदही करण्यात आल्याने वीज चोरांचे धाबे दणाणले आहे.

नागपूरच्या महाल, गांधीबाग, सिव्हिल लाईन्स या भागातील सुमारे सव्वापाच लाख ग्राहकांना एसएनडीएलमार्फत तर इतर भागातील सुमारे सव्वा लाख ग्राहकांना महावितरणकडून वीजपुरवठा केला जातो. महावितरणच्या काँग्रेसनगर भागात वीज चोरीचे प्रमाण कमी असले तरी शहरातील इतर भागात आजही सर्रास वीज चोरी केली जाते. एसएनडीएलच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या मोमीनपुरा, यशोधरानगर, कामठी रोड या भागात वीज चोरी अधिक होते. आतापर्यंत चोरी पकडल्यावर गड्डीगोदाम येथील विशेष पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवल्या जात होत्या. तेथील मनुष्यबळाच्या अभावामुळे चौकशीला विलंब होत होता.

वीज चोरी करताना प्रामुख्याने मीटरमध्ये बिघाड केला जातो. वीज नियामक आयोगाच्या नियमानुसार मीटर ही सार्वजनिक मालमत्ता आहे. त्याच्याशी छेडछाड हा सार्वजनिक संपत्तीशी छेडछाड ठरते. त्यामुळे वीज चोरांवरही याच आधारावर गुन्हे दाखल करावे, अशी विनंती एसएनडीएलने आयोगाकडे केली व ती त्यांनी मान्य केली. त्यानुसार शहर पोलिसांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वीज चोरीच्या घटनांमध्ये अशाप्रकारचा गुन्हा दाखल करण्याबाबत संकेत दिले आहे. एसएनडीएलकडून यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रथमच चार ते पाच ग्राहकांवर या कलमांतर्गत गुन्हे दाखल झाले आहे. राज्यात प्रथमच या स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहे. यामुळे वीज चोरींवर नियंत्रण येण्याची शक्यता आहे.

आकोडा टाकणाऱ्यांवर जीवितास धोका निर्माण करण्याचा गुन्हा

नागपूर शहरातील बहुतांश झोपडपट्टय़ांमध्ये तारांवर आकोडा टाकून वीज चोरी करतात. त्यांच्यावर नियमितपणे कारवाई होत असली तरी यावर अद्यापही पायबंद बसलेला नाही. विद्युत प्रवाह असलेल्या तारांवर लोखंडी आकोडा टाकताना जीवितास धोका होऊ शकतो. त्यामुळे असे प्रकार करणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.

वीज चोरीचा भरुदड अप्रत्यक्षरित्या वीज बिल प्रामाणिकपणे भरणाऱ्या ग्राहकांवर बसतो. असे प्रकार करणाऱ्यांवर सार्वजनिक संपत्तीला बाधा पोहचवण्यासह जीवितास धोका निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केल्या जाईल.

सोनल खुराना, व्यवसाय प्रमुख, एसएनडीएल, नागपूर

एसएनडीएलच्या कार्यक्षेत्रातील वीज चोरी

आर्थिक वर्ष     ग्राहक संख्या    रक्कम

२०११- १२      १,०५७         ३.८० कोटी

२०१२- १३      २,१०४         १०.७४

२०१३- १४      ४,७५४         १६.९७

२०१४- १५      ४,०७७         १०.०६

२०१५- १६      २,५४९         ८.१३

२०१६- १७      २,६४१         ९.३२

२०१७- आज     ६२७           २.८२

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2017 2:58 am

Web Title: electricity issue nsdl nagpur municipal corporation
Next Stories
1 लोकजागर : मनोरुग्ण कोण?
2 पावसाळा पूर्व नियोजन का फोल ठरले?
3 पावसामुळे दाणादाण, सर्वत्र पाणीच पाणी!
Just Now!
X