वीज चोरी पकडली जाण्याची भीती; एसएनडीएलकडून ९४ चोऱ्या उघडकीस

एसएनडीएल कंपनीच्या भरारी पथकांनी गेल्या तीन दिवसांत ताजबाग परिसरात ९४ वीज चोऱ्या उघडकीस आणल्या आहेत. याप्रसंगी तेथे २५ मीटर एसएनडीएलला जळालेल्या स्थितीत आढळले. या ग्राहकांनी त्यांची वीजचोरी लपवण्यासाठी हे मीटर जाळल्याचा संशय एसएनडीएलला आहे. या मीटरच्या चिप प्रयोगशाळेत तपासले जाणार आहेत.

नागपूरच्या महाल, गांधीबाग, सिव्हिल लाईन्स या तीन भागातील पाच लाखाहून जास्त ग्राहकांना एसएनडीएलकडून वीजपुरवठा होतो. ताजबाग परिसरात जास्त वीजचोरी  होत असल्याने १४ मार्चपासून येथे चार भरारी पथकांच्या मदतीने पोलीस संरक्षणात एसएनडीएलचे कर्मचारी कारवाई करत आहेत. पहिल्या दिवशी येथे एसएनडीएलच्या कर्मचाऱ्यांवर संतप्त नागरिकांनी दगडफेक केली होती. त्यानंतर पोलिसांनी येथे सहा आरोपींवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. त्यानंतरही एसएनडीएलकडून येथे कारवई अभियान सुरू आहे. कारवाई दरम्यान तेथील मीटरमध्ये फेरफार करून देयकाचे पैसे वाचवण्याऱ्या ग्राहकांच्या मनात त्यांची वीजचोरी उघडकीस येण्याची भीती निर्माण झाली आहे. पैकी काहींनी स्वत:चा गुन्हा उघडकीस येऊ नये म्हणून त्यांच्या घर व प्रतिष्ठानातील वीज मीटर जाळले आहे. त्यातील काही मीटर हे गॅस कटरसदृश्य उपकरणाने जाळण्याचे एसएनडीएलच्या निदर्शनात आले. या मीटरमधील विशिष्ट चिपच्या मदतीने एसएनडीएल वीजचोरी उघडकीस आणण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याकरिता या चिप विशिष्ट प्रयोगशाळेत तपासले जाणार आहे. त्यात ग्राहक दोषी आढळल्यास त्यांच्यावर एसएनडीएलकडून कारवाई होणार आहे. दरम्यान मीटर जळलेल्या घर व प्रतिष्ठानाला कुलूप लावून अनेक जण बेपत्ता झाल्याचेही एसएनडीएलच्या निदर्शनात आले आहे. त्यामुळे हे ग्राहक कारवाईच्या भीतीने भूमिगत झाल्याचाही एसएनडीएलला संशय आहे.