News Flash

पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित

हिंगणा तालुक्यातील खडकी या गावात तब्बल ३८ शेतकऱ्यांना प्रशासकीय घोळाचा फटका बसला आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

खडकीतील ३८ शेतकऱ्यांना बँकांच्या चुकांचा फटका

राजेश्वर ठाकरे, नागपूर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा  करून एक वर्ष पाच महिने नऊ दिवस झाले आहे, परंतु अद्याप पात्र शेतकऱ्यांचाही सातबारा कोरा झाला नाही.  नागपूर जिल्ह्य़ातील  एका गावातील तब्बल ३८ शेतकऱ्यांना  कर्जमाफीपासून वंचित ठेवण्यात येणार आहे.

राज्य सरकारने २२ जून २०१७ ला शेतकरी कर्जमाफी जाहीर केली. पारदर्शकता राहावी म्हणून अर्ज ऑनलाईन मागवण्यात आले. यात पारदर्शकता किती आली हे सांगणे अवघड असले तरी तांत्रिक चुका आणि प्रशासनाचा हलगर्जीपणा यामुळे पात्र शेतकऱ्यांची देखील अद्याप कर्जमाफी होऊ शकलेली नाही.

हिंगणा तालुक्यातील खडकी या गावात तब्बल ३८ शेतकऱ्यांना प्रशासकीय घोळाचा फटका बसला आहे. कोणाचे कर्ज दुप्पट दाखवण्यात आले तर कुणाला कर्जाच्या रकमेपेक्षा अधिक रक्कम आधी भरा. त्यानंतर कर्जमाफी केली जाईल, असे सांगण्यात येत आहे. दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी असताना काही शेतकऱ्यांना केवळ १६ हजार, २० हजार रुपयांची कर्जमाफी देण्यात आली.

खडकी येथील गंगाधर आनंद बुधबावरे (५९) यांच्याकडे अडीच एकर शेती आहे. त्यांनी बँक ऑफ इंडियामधून ऑक्टोबर २०१४ ला ८७ हजार (३३ हजारांचे वैयक्तिक कर्ज आणि ४५ हजारांचे तात्काळ कर्ज) रुपयांचे कर्ज घेतले. तसेच २०१३ नागपूर को-ऑप. डिस्ट्रिक बँकेतून ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले. त्यांनी योजना जाहीर झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज केला, परंतु पहिल्या यादीत नाव आले नाही. दुसऱ्या यादीत आले, परंतु त्यात दीड लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असल्याचे दिसून आले. दोन्ही बँकेचे कर्ज एकूण एक लाख १३७ हजार रुपये होत असताना हे कसे झाले, याची माहिती घेतली असता बँक ऑफ इंडियाने ३३ हजार रुपयाची  नोंद दोन वेळा केल्याचे स्पष्ट झाले. तसेच कर्जमाफीची १ लाख ४७ हजार रुपयांची रक्कम बँक ऑफ इंडियाच्या खात्यात जमा झाली आणि उर्वरित तीन हजार रुपये नागपूर जिल्हा बँकेत जमा झाले.  बँक ऑफ इंडियाच्या खात्यात ८० हजार रुपये अधिक जमा झाल्याचे आणि जिल्हा बँकेतील कर्ज व्याजासह ६५ हजार रुपये असून देखील केवळ तीन हजार रुपये जमा झाल्याची तक्रार गंगाधर बुधबावरे यांनी नागपूर जिल्हाधिकारी यांच्याकडे २१ ऑगस्टला केली. त्यानंतर ही रक्कम सर्व रक्कम परत गेली. आता ११ वी यादी प्रसिद्ध झाली, परंतु हा तांत्रिक घोळ सुटलेला नाही आणि कर्जमाफी झाली नाही. त्यामुळे नवीन कर्ज देखील मिळाले नाही, असे गंगाधर बुधबावरे म्हणाले.

याच तालुक्यातील कान्होलीबारा येथील अनिल नानाजी लाड (५०) या शेतकऱ्याकडे दोघा भावांची मिळून दहा एकर शेती आहे. त्यांनी ९ जून २०१५ ला युनियन बँकेचे एक लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज केला, परंतु दीड लाख रुपयांचे कर्ज माफ करण्यासाठी आधी एक लाख ४३ हजार ६२२ रुपये भरण्यास सांगण्यात आले आहे. अशाप्रकारे एक लाखाच्या कर्जावर एक लाख  ४३ हजार रुपये भरून वन टाईम सेटलमेंट करण्याची सूचना करण्यात आली आहे.

‘‘पहिल्या टप्प्यात जिल्ह्य़ातील ५८ हजार शेतकरी पात्र ठरले होते. काही त्रुटीमुळे २५ हजार शेतकऱ्यांना पुन्हा अर्ज भरण्यास सांगण्यात आले. त्यातील १० ते १२ हजार शेतकरी पात्र ठरले आहेत. तांत्रिक कारणांमुळे किंवा बँकांच्या चुकीमुळे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित असतील. अशी  प्रकरणे निदर्शनास आल्यावर त्रूटी दूर केली जाईल. दुय्यम सहायक निबंधक आणि संबंधित बँकांना सूचना देण्यात येतील.’’

      – अश्विन मुद्गल,  जिल्हाधिकारी, नागपूर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2018 2:07 am

Web Title: eligible farmers are deprived from bank loan
Next Stories
1 लोकजागर : उमद्या व खुज्या रेषांची स्पर्धा
2 सुपारी व्यापाऱ्यांचे ३०० लॉकर सील!
3 तहसीलदाराला फरफटत नेणाऱ्या दोघांना अटक
Just Now!
X