मुंबईतील एका विमानतळाचा व एका रेल्वेस्थानकाचा नामविस्तार आणि दुसऱ्या एका रेल्वेस्थानकाचे नामांतर करण्यास शुक्रवारी विधानसभेत एकमताने मंजुरी दिली.

विधानसभेने मंजूर प्रस्तावानुसार ‘छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई’ याचा नामविस्तार छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई असा करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस या रेल्वेस्थानकाचा नामविस्तार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, असा करण्यात येणार आहे, तर एल्फिन्स्टन रोड या रेल्वेस्थानकाचे नाव बदलून ‘प्रभादेवी’ असे करण्याची शिफारस करण्यात आली आहे. आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. सीएसटी स्थानकाचे आधीचे नाव व्हिक्टोरिया टर्मिनस (व्हीटी) असे नाव होते.

******

माध्यमांमुळे महाराष्ट्र केसरी प्रवेशद्वारावर अडकला

सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी जिंकणाऱ्या विजय चौधरीचा विधिमंडळातील दोन्ही सभागृहांत शुक्रवारी अभिनंदन प्रस्तावातून गौरव करण्यात आला. या प्रसंगी विजयही उपस्थित होता. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन व विविध मंत्र्यांसह प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनीही त्याच्यासोबत परिसरात सेल्फी काढली. इलेक्ट्रॉनिक प्रसिद्धी माध्यमांना त्याची प्रतिक्रिया हवी होती. ती नियमाने परिसरात घेता येत नसल्याने त्याला बाहेर नेणे आवश्यक होते, परंतु विजयकडे परिसरात प्रवेश पास नव्हता. प्रसिद्धी माध्यमांनी त्याला पुन्हा आत प्रवेश मिळवून देण्याची हमी देत मागच्या द्वाराने बाहेर नेऊन बाइट घेतले. पुन्हा विधिमंडळ परिसरात येत असताना सुरक्षा यंत्रणांनी त्यांना प्रवेशद्वारावर अडवले. प्रसिद्धी माध्यमांनी त्याचा परिचय करून दिल्यावरही त्याला सुरक्षा यंत्रणेने प्रवेश दिला नाही. जवानांनी त्याला समोरच्या प्रवेशद्वारावरून जाण्याचा सल्ला दिला. सुरक्षा यंत्रणेची चूक नसली तरी या घटनेने दोन्ही सभागृहांत गौरव करण्यात आलेल्या महाराष्ट्र केसरी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींमुळे प्रवेशद्वारावर अडकला.

******

सत्ताधारीही पायऱ्यांवर

उपराजधानीत हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून नागपुरात ग्रामीण भागातील भाजपचे एकही आमदार विविध मागण्यांकरिता विधिमंडळाच्या पायरीवर आले नसल्याचे प्रथमच चित्र निर्माण झाले. नागरिकांच्या मनात या प्रकारामुळे जिल्ह्य़ातील सगळ्याच समस्या सुटल्या काय, हा विचार सुरू झाला होता, परंतु शुक्रवारी भाजपचे रामटेक मतदारसंघातील आमदार मल्लिकार्जुन रेड्डी हे धानाला ५०० रुपये बोनस देण्यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता विधान भवनाच्या पायरीवर आले. या घटनेमुळे भाजपचे नागपूर जिल्ह्य़ातील सत्ताधारीही पायऱ्यांवर उतरल्याचा अनुभव सगळ्यांना आला, परंतु शहरातील एकाही आमदाराने अद्याप एकाही मागणीकरिता पायऱ्यांवर आंदोलन केले नाही, हे विशेष.