मेडिकलमध्ये येणाऱ्या रुग्णांना मन:स्ताप

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) शल्यक्रिया विभागातील आकस्मिक विभागात प्लास्टिक सर्जरी विभागातील डॉक्टर पूर्णवेळ बसत नाहीत. त्यामुळे अपघाताची गुंतागुंत असलेल्या बऱ्याच रुग्णांना या डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी ताटकळत रहावे लागत असल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. या रुग्णांचा प्रत्येक क्षण महत्त्वाचा असल्याने येथे पूर्णवेळ डॉक्टर का दिला जात नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

विदर्भात करोनाबाधितांसाठी सर्वाधिक खाटा मेडिकलमध्ये उपलब्ध आहेत. एकेकाळी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात नागपुरातील सर्वाधिक अत्यवस्थ करोनाबाधित येथेच दाखल होते. आता नागपूरसह विदर्भात करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर येथेही रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. दरम्यान, मेडिकलमध्ये आता करोनाबाधितांच्या तुलनेत करोना नसलेले इतर आजाराचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यात अपघातग्रस्तांचाही समावेश आहे. अपघातासह इतर काही रुग्णांना प्लास्टिक सर्जरी विभागातील डॉक्टरांचा सल्ला आवश्यक असतो. त्यामुळे हे तज्ज्ञ मेडिकलच्या आकस्मिक विभागात असायला हवे. परंतु हे डॉक्टर येथे नियुक्त नाहीत. त्यामुळे येथील मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना असे रुग्ण आल्यावर सूचना देऊन त्यांना बोलवावे लागले. परंतु एकाच वेळी अधिक रुग्ण आल्यास किंवा या डॉक्टरांना येथे रुग्णांना बघण्यासाठी यायला विलंब झाल्यास हे अत्यवस्थ  रुग्ण येथे ताटकळत राहतात. हा धोका टाळण्यासाठी येथे पूर्णवेळ प्लास्टिक सर्जरी विभागाच्या डॉक्टरांची नियुक्ती करण्याची मागणी केली जात आहे. त्याबाबत लवकरच वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांना विदर्भ वैद्यकीय महाविद्यालय व आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेकडून निवेदन दिले जाणार आहे.