मंगेश राऊत

गडचिरोली पोलीस अधीक्षक पदावर काम करण्याचा अनुभव आणि पोलीस उपमहानिरीक्षक पदाची नवीन उर्जा यांचा ताळमेळ बसवून गडचिरोली व गोंदिया जिल्हयातून नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी यशस्वी मोहीम राबवण्यावर भर दिला जाईल, असे मत गडचिरोली गोंदिया या नक्षलग्रस्त जिल्हा परीक्षेत्रांची धुरा सांभाळणारे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी व्यक्त केले.

संदीप पाटील यांनी गुरुवारी नागपुरातील कार्यालयात नवीन पदभार स्वीकारला. यानंतर शुक्रवारी त्यांनी ‘लोकसत्ता’शी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, गडचिरोली जिल्हा पोलीस अधीक्षक असताना जिल्हयातील नक्षलवाद्यांवर मोठय़ा प्रमाणात कारवाई केली होती. माझ्या काळात सर्वाधिक नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली होती. आता नव्याने पुन्हा आपल्यावर नक्षलग्रस्त भागाची जबाबदारी सरकारने टाकली आहे. त्यामुळे आता काम करताना जुना अनुभव पाठीशी आहेच. अनुभव आणि नवीन ऊर्जा यांची सांगड घालून योजना आखण्यात येतील. गुप्त माहितीच्या आधारावर मोहीम राबवताना त्या अधिकाधिक यशस्वी कशा होतील, यावर भर देण्यात येईल. यासोबत नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात परत यावे, याकरिता शासनाची योजना आहे. नक्षलवाद्यांची नेत्यांनी आत्मसमर्पण करावे, याकरिता प्रामुख्याने प्रयत्न करण्यात येतील. तसेच राज्य सरकारच्या विविध योजना स्थानिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनाला आवश्यक असलेली मदत करण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल. गोंदिया जिल्हयातील काही तालुक्यांमध्येच नक्षलवादाचा प्रभाव आहे. त्या भागांवर गडचिरोलीप्रमाणेच लक्ष केंद्रीत करून उर्वरित गोंदिया जिल्हयातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. नक्षल्यांविरुद्ध मोहीम राबवताना मानक सुरक्षा प्रणालीचे पालन करण्यात येईल व त्यानुसार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. दोन्ही जिल्हयाच्या पोलीस प्रशासनाचा कारभार स्वच्छ व पारदर्शी कसा राहील, याकडे लक्ष देण्यात येईल, अशी माहिती संदीप पाटील यांनी दिली.