स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्रज्ञांच्या परिषदेतील सूर

नागपूर : मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये एखादी स्त्री गृहिणी असेल तर तिचे गरोदरपणात पुरेसे पोषण होते. आरामही मिळतो. मात्र स्पर्धेच्या युगात पुरुषांच्या बरोबरीने काम करणाऱ्या शहरी स्त्रीयांचे गरोदरपणात स्वत:कडे दुर्लक्ष होते, असा सूर स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञांच्या परिषदेत व्यक्त झाला.

स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञांच्या संघटनेतर्फे शनिवारपासून उपराजधानीलीत हॉटेल सेंटर पॉईंट येथे तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेला सुरुवात झाली. यात देशभरातील स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र तज्ज्ञांनी हजेरी लावली आहे. याप्रसंगी डॉ. सुचित्रा पंडित म्हणाल्या, शहरी भागातल्या स्त्रीयांचे गरोदरपणातही आहाराकडे दुर्लक्ष होते. शिवाय येथे स्त्रियांमध्ये उच्चरक्तदाब, मधुमेह, स्थूलपणाचे प्रमाण वाढत आहे. हे आजार बाळंतपणातल्या जोखिमा वाढवतात. त्यामुळे बाळ आणि आईला देखील पोषक आहार मिळत नाही. परिणामी, विविध धोके संभावतात. कामातल्या ताण तणावाचे परिणाम गर्भातल्या बाळावर होतात. त्यामुळे अशा शहरी स्त्रिया गरदोरपणाच्या जोखमीवर असतात. गर्भधारणेनंतर गरोदर मातेला रुबेलासह अन्य गंभीर आजारांचा जंतू संसर्ग झाला तर बाळंतपणादरम्यान जोखीम वाढून मूदतपूर्व मूल जन्माला येऊ  शकते. कामातल्या ताण तणावाचा परिणामही गर्भावर होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

गरोदर स्त्रियांमध्ये हिमोग्लोबीनचा अभाव

डॉ. पॅट्रिक जेम्स म्हणाले, भारतात प्रसुत होणाऱ्या दर लाख स्त्रियांपैकी पूर्वी १६७ गरोदरमाता बाळंतपणादरम्यान दगावत होत्या. मात्र, सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे ही संख्या कमी होऊन १४० वर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने देखील याची नोंद घेतली आहे. तरीही भारतीय गरदोर स्त्रियांमध्ये आजही रक्तातल्या हिमोग्लोबीनची कमतरता आढळते. त्यामुळे बाळंतपणादरम्यानच्या जोखिमा वाढतात. डॉ. एम.सी. पटेल म्हणाले, रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये दुरावा वाढत आहे. त्याला कांही अंशी डॉक्टरही जबाबदार आहेत. हल्लीची उपचार पद्धती नको तितक्या प्रमाणात चाचण्यांना शरण गेली आहे. त्यामुळे कधी कधी गरज नसतानाही चाचण्या सांगितल्या जातात.