राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात मनमानी कारभार
गुणवाढ प्रकरणातील आरोपी विद्यापीठात मोकळे फिरत आहेत, बनावट पीएच.डी. धारकांना विद्यापीठाने अधिकारपदावर बसवले आहे, तांत्रिकपदावर नियुक्ती असणाऱ्यांना प्रशासकीय अनुभव नसतानाही उपकुलसचिव पदावर नियुक्त करण्यात आले, अशा चुकीच्या गोष्टी घडत असताना एकउच्च श्रेणी लिपीक जेव्हा कुलसचिवांचे नाव पुढे करून पैशाची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात तक्रार करतो तेव्हा कुलसचिव पूरण मेश्राम अधिकाराचा वापर करून त्याला घरी बसवतात, असा मनमानी कारभार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सुरू आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा विभागात २५-२६ वर्षांपासून एकाच पदावर काम करणारे चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत. ते तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांची कामे पाहतात. असे कर्मचारी विद्यापीठांतर्गत बदल्या करणाऱ्या अधिकाऱ्यांचे खिसे गरम करीत असतात, ही बाब राजेश खानोरकरांच्या निलंबनाने उघड झाली. कामाचा व्याप जास्त असल्याने खानोरकर यांच्या विभाग प्रमुखाने त्यांना त्याच विभागात ठेवून त्यांचे रुजू पत्र कुलसचिवांकडे पाठवले. विभाग प्रमुख सोडायला तयार नसतानाही विद्यापीठातील अधिकारी प्रदीप बिनिवाले आणि वसिम अहमद यांनी व्यावसायिक परीक्षा विभागात राहायचे असेल तर कुलसचिवांना पैसे द्यावे लागतील, अशी मागणी केली. मात्र, विद्यापीठाने यासंदर्भात खरे-खोटे तपासून पाहण्याआधीच कुलसचिवांनी खानोरकरांना निलंबित करून ‘चोर सोडून संन्यासाला फाशी’ ही म्हण खरी ठरवली आहे. यावरून कुलसचिव दोषींना पाठीशी घालत असल्याचे स्पष्ट होते. खानोरकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात लेखी, निराधार, बदनामीकारक आरोप करून गंभीर स्वरुपाचे वर्तन केल्याने निलंबित करण्यात आल्याचे पूरण मेश्राम यांनी या संदर्भात पत्रकार परिषदेत सांगितले. राजेश खानोरकर यांना १५ जूनला निलंबित केले असून त्यांच्यावर अशोभनीय वर्तन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच वित्त विभागात जाऊन खानोरकर तेथील कर्मचाऱ्यांना थकबाकी काढण्यासाठी धमकी दिल्याने तेथील कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरून रविवारी अंबाझरी पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

प्रकरण असे आहे
खानोरकर यांच्याकडे बीबीएच्या तिन्ही वर्षांच्या परीक्षा, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन कम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन (पीजीडीसीए) प्रथम आणि दुसरे सत्र, मास्टर ऑफ अप्लाईड मॅनेजमेंट (एमएएम) अभ्यासक्रमाचे दहा सत्र, पदविका विपणन व्यवस्थापन, कार्यालय व्यवस्थापन, कर पदविका, वित्त व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम, शिवाय आवकजावकचा टेबल, इत्यादी प्रकारची कामे खानोरकर यांच्याकडे आहेत. खानोरकर २०१३पर्यंत विद्यापीठाच्या पुरातत्व विभागात होते. त्यानंतर २०१३मध्ये परीक्षा भवनातील व्यावसायिक परीक्षा विभागात त्यांची बदली करण्यात आली. त्यांना सहा महिन्यांपूर्वी तृतीय श्रेणी लिपिक म्हणून पदोन्नती मिळाली. तिही बिनपगारी! पदोन्नती देत असताना विद्यापीठ परिसरातील पदव्युत्तर राज्यशास्त्र विभागात त्यांची बदली करण्यात आली. मात्र, त्यांचे विभाग प्रमुख सयाम यांनी त्यांना तेथून न हलविता त्याच पदावर ठेवले. मात्र, त्याच विभागात राहायचे असेल तर पैसे द्यावे लागतील, असे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी त्यांना बजावल्याने खानोरकर यांनी कुलसचिवांकडे तक्रार केले आणि त्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

राजेश खानोरकर म्हणाले, मला पैसे मागत असल्याची तक्रार कुलसचिवांकडे केली. त्यासंबंधीचे पुरावे सक्षम प्राधिकरणाकडे देण्याची तयारी दर्शवली. मात्र, कुठलीही चौकशी न लावता धोरणात्मक निर्णय घेऊन निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे पत्रकारांकडून समजले. म्हणून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यासाठी पोलिसांची परवानगी १६ जूनला घेतली असून निलंबन आदेश अद्याप मिळालेला नाही.