विरोधकांचा सवाल, परिषदेत गदारोळ

कथित योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली उद्योग समूहाने नागपूरमधील मिहानमध्ये फूडपार्कसाठी सवलतीच्या दरात जागा घेताना केलेल्या पाच हजार रोजगार निर्मितीच्या दाव्याचा आधार काय? या उद्योगसमूहाचा या क्षेत्रातील पूर्वइतिहास तपासला का, असे एक नव्हे तर अनेक सवाल करीत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले, प्रत्यक्ष कामाची परिस्थिती पाहण्यासाठी सदस्यांचा मिहान दौरा आयोजित करण्याचे निर्देश सभापतींनी दिले.

पतंजली उद्योग समूहाला दिलेल्या सवलतीच्या दरातील जागेवरून आज पुन्हा अधिवेशनात वादळी चर्चा झाली. गेल्यावर्षी काँग्रेस सदस्य संजय दत्तनेच हा मुद्दा उपस्थित करून या प्रकरणात घोटाळा झाल्याचा आरोप केला होता, सरकारने हे सर्व आरोप फेटाळून लावत पारदर्शक पद्धतीनेच सरकारने उद्योगाला जागा दिल्याचा दावा केला होता. यावेळी पुन्हा संजय दत्त यांनी हा मुद्दा उपस्थित केला. पतंजलीने पाच हजार तरुणांना रोजगार देऊ, असा दावा केला आहे. त्याचा आधार काय असा सवाल केला. त्यांचा पूर्वइतिहास तपासला का, ते कोणते तंत्रज्ञान वापरणार आहे, असे प्रश्न त्यांनी केले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही चर्चेत भाग घेताना जागेसाठी आणखी कोणत्या कंपन्यांच्या निविदा आल्या होत्या. ही जागा फूडपार्कसाठी राखीव होती का? जागा विकसित करण्यासाठी किती खर्च करण्यात आला आदी सवाल करून या व्यवहारात संशय निर्माण करणाऱ्या अनेक बाबी असल्याचा आरोप केला. मिहानच्या दोन अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदलीचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

सरकारकडून संबंधित खात्याचे राज्यमंत्री मदन येरावार यांनी उत्तर दिले. मात्र, सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडल्याचा दावा करीत अधिकाऱ्यांच्या बदल्या प्रशासकीय बाब असल्याचे सांगितले. मात्र, पतंजलीच्या रोजगार निर्मितीच्या दाव्याबाबत ते खुलासा करू शकले नाही, त्यामुळे विरोधक आक्रमक झाले व विचारलेल्या मुद्यांना उत्तरे द्या किंवा लक्षवेधी राखून ठेवा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी सभागृहात उपस्थित महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना यश आले नाही. सदस्यांच्या शंका दूर करण्यासाठी सरकारने मिहानमध्ये दौरा आयोजित करावा, असे निर्देश सरकारला दिले.

सरकार उद्योगधार्जिणे

सामाजिक उद्देशासाठी जागा हवी असेल तर सरकारकडून सवलत दिली जाते, मात्र, पतंजली उद्योग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बालकृष्णन हे बडे उद्योगपती आहेत, सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत त्यांचा आठवा क्रमांक आहे. त्यांना सवलत देऊन सरकारने ते उद्योगधार्जिणे आहे, हे दाखवून दिले.

संजय दत्त