22 February 2019

News Flash

‘आयटीआय’च्या ८५० विद्यार्थ्यांना रोजगार संधी

८५० उमेदवारांची प्राथमिक निवड करून त्यांना पुढील मुलाखतींसाठी कंपन्यांमध्ये बोलावण्यात आले आहे

मुलाखतीसाठी आलेले विद्यार्थी.

नागपूर : पदवी वा पदव्युत्तर अभ्यासक्रमानंतर रोजगाराच्या फारशा संधी उपलब्ध नाहीत, तेवढय़ा आयटीआय उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी  उपलब्ध आहेत.  गुरुवारी झालेल्या  रोजगार मेळाव्यात तब्बल ८५० उमेदवारांची  विविध कंपन्यांमध्ये निवड झाली.

दीक्षाभूमीजवळच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागीय मुख्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा  पार पडला. त्यात विदर्भातील  काही कंपन्यांसह २३ कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या कंपन्यांमधील १७०० रिक्त जागांसाठी १४०० आयटीआय उमेदवारांनी नोंदणी केली. या कंपन्यांमध्ये प्रामुख्याने फ्युचर सप्लाय चेन सोल्युशन लि., अमरावतीची रेमंड, महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा, हल्दिराम फुडस् इंटरनॅशनल प्रा.लि., इंडोरमा सिंथेटिक्स, आयटीएम स्किल्स अ‍ॅकेडमी (आयसीआयसीआय बँक), इंडिगो डेमिन प्रा.लि., सिअ‍ॅट टायर्स, साज फुडस् प्रॉडक्टस् प्रा. लि., कॅप्सटॉन फॅसिलिटी मॅनेजमेंट, एसआयएस सेक्युरिटी एजन्सी, मोरारजी टेक्सटाईल्स लि., जॉब प्लस करिअर, अ‍ॅग्रीकल्चर प्रा.लि., टॉपवर्थ उर्जा अ‍ॅण्ड मेटल्स लि. आणि डिफ्युजन हिंगणा आदींचा समावेश होता. या कंपन्यांमध्ये अ‍ॅटोमोबाईल अभियंता, कृषी सहाय्यक, प्रिंटर, वेल्डर, सूक्ष्मजीवशास्त्रतज्ज्ञ, ऑपरेटर, तपासणीस, विक्री अधिकारी, सुरक्षा रक्षक आणि प्रशिक्षक इत्यादी जागा रिक्त आहेत.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून अभ्यासक्रम करून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागते. कुशल कारागीर हवा असलेल्या कंपन्यांनाही त्यांच्याकडील रिक्त जागांची माहिती देतात. त्यानुसार ते विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी आयटीआयशी संपर्क साधतात. एकूण कोणत्या कंपनीत, कोणत्या जागा रिक्त  आहेत याची माहिती विद्यार्थ्यांना ऑनलाईन उपलब्ध होते.

आयटीआयच्यावतीने अशाप्रकारचे रोजगार मेळावे दरवर्षी  होतात. आज झालेल्या मेळाव्यात  ८५० उमेदवारांची प्राथमिक निवड करून त्यांना पुढील मुलाखतींसाठी कंपन्यांमध्ये बोलावण्यात आले आहे.

– हेमंत आवारे, प्राचार्य, आयटीआय

First Published on October 12, 2018 2:28 am

Web Title: employment opportunities for 850 students of iti