मुख्यमंत्र्यांपासून मंत्र्यांचे शासकीय निवासस्थान आणि आमदार निवासासह सिव्हील लाईन्स भागातील प्रभाग क्रमांक १४ च्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका प्रगती पाटील यांनी सलग दोन वेळा महापालिकेत प्रतिनिधीत्व केले. सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर त्यांनी केलेली विकास कामे आणि सभागृहात महिला बचत गटासह विविध विकास कामासंदर्भात उपस्थित केलेल्या मुद्दय़ांमुळे त्या चर्चेत राहिल्या आहेत. विशेषत: महिलांसाठी विविध योजना राबवून त्यांना प्रोत्साहन देण्यासोबतच रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.

२००७ आणि २०१२ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका म्हणून त्यांनी महापालिकेत प्रतिनिधीत्व केले. २०१४ मध्ये गटनेत्या म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. प्रभाग क्रमांक १४ हा शहरातील ‘व्हीव्हीआयपी’ भाग म्हणून ओळखला जात असला तरी तोही झोपडपट्टीबहुल परिसर आहे. या झोपडपट्टीमध्ये कचरा साठवण्याची समस्या असल्यामुळे अनेकदा त्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. मोहननगर झोपडपट्टीबहुल असल्यामुळे या भागात मलवाहिनीची मोठी समस्या होती. शिवाय अनेक चेंबर उघडे होते.  प्रभागाच्या निधीतून ती कामे करण्यात आली. कसाई पुरा भागात जनावरांच्या हत्या केल्या जातात. त्यामुळे अनेकदा रक्तमिश्रित पाणी येत होते आणि त्यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. हा विषय त्यांनी सभागृहात उपस्थित करून त्यावर तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी केली होती. प्रशासनाने दखल घेत जवळ असलेल्या शक्ती नाल्याशी तेथील वाहिनी जोडण्यात आली. या नाल्यावर स्लॅब टाकून सुरक्षा भिंतही बांधण्यात आली.

शहरात  २४ बाय ७ योजनेची प्रभावी अंमलबजावणी प्रभाग क्रमांक १४ च्या बहुतांश भागात झाल्याने येथे पाण्याची फारशी समस्या नाही. परंतु या योजनेमुळे नागरिकांना अव्वाच्या सव्वा पाण्याचे बिल आल्याच्याही तक्रारी आहेत. गोंडटोळीसह इतर काही भागात पाण्याच्या फुटलेल्या पाईपालाईनचेही बिल संबंधित कंपनीने काही नागरिकांच्या बिलात जोडल्याचा काहींचा आरोप आहे. त्यामुळे काही झोपडपट्टीधारकांना हजारोंची बिले आली. या बिलांचा भरणा करण्याची आर्थिक क्षमता या नागरिकांत नसल्याने त्यांना न्याय देणार कोण? हा प्रश्न येथे उपस्थित केला जात आहे. मात्र, त्या संदर्भात पाटील यांनी महापालिकेत आयुक्तांना निवेदन दिले होते. गोंडटोळीसह फुटाळातील बऱ्याच भागात वारंवार मागणी व आश्वासन मिळाल्यावरही अद्याप नागरिकांना मालकी हक्काचे जमीन पट्टे वाटप करण्यात आले.

 

विकास कामे

मोहननगरमध्ये मलवाहिनी

शक्ती नाल्यावर सुरक्षा भिंत  आणि पूल

महिलांच्या विकासासाठी  रोजगाराच्या दृष्टीने विविध उपक्रम

प्रभागात अनेक ठिकाणी सिमेंट रस्ते

अपंग सेलच्या निधीत वाढ

सौंदर्यीकरणावर भर देण्याची गरज

प्रभागात रस्ते, पाणीची समस्या जास्त नसली तरी ‘व्हीव्हीआयपी’चा प्रभाग असल्याने येथे सौंदर्यीकरणावर भर देण्याची गरज आहे. प्रभागाचे पूर्वीच्या तुलनेत सौंदर्य कमी झाले आहे. माकडांसह डुकरांचा त्रास जास्त असल्याने तातडीने त्यावर नियंत्रणाची गरज असून सदर, टिळकनगर भागात पार्किंगमुळे नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून उपाय शोधायला हवे. प्रभागात अनेक विकास कामे करताना ज्या ठिकाणी निधी खर्च करण्याची गरज होती त्या ठिकाणी केला नाही. प्रभागामध्ये अनेक ठिकाणी अतिक्रमण वाढले आहे. मात्र, त्यासंदर्भात कुठलीच कारवाई केली जात नाही. पावसाळ्याच अनेक झोपडपट्टी असलेल्या वस्तीमध्ये पाणी साचत आहे.

– राजश्री किशोर जिचकार, २०१२ मधील निवडणुकीतील पराभूत उमेदवार