राजकीय इच्छाशक्ती आणि स्थानिक प्रशासनाच्या एकत्रित प्रयत्नांमुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मालकीच्या जागेवरील काही अतिक्रमणे हटवण्यात आज यश आले. गेल्या २० वर्षांपासून अतिक्रमणाचे भिजत घोंगडे कायम होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने पुढाकार घेत ही अतिक्रमणे काढून टाकण्यास सुरुवात केली असून आज दोन तर सोमवारी चार अतिक्रमणे हटवण्यात येणार आहेत.
विद्यापीठ परिसराला लागून असलेल्या जागेवर धाबे, बार आणि आणि इतर मिळून १० अतिक्रमणे आहेत. आश्चर्य म्हणजे अतिक्रमणाच्या जागेवर अन्न, वीज आणि पाणी पुरवण्याची परवानगी देण्यात आली होती. गेल्या काही वर्षांमध्ये विद्यापीठाच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी विद्यापीठाच्या सिनेटपासून ते विधानसभेपर्यंत अनेक प्रयत्न करण्यात आले. विद्यापीठाचे कुलसचिव, अतिरिक्त जिल्हाधिकारी, उत्पादन शुल्क खात्याचे अधिकाऱ्यांची वेळोवेळी बैठकी झाल्या. मात्र, विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनावर घेतल्यानंतर हे अतिक्रमण हटवणे शक्य झाल्याचे दिसून येते. आज ७.७२९ एकर जागेवरील दोन अतिक्रमणे हटवण्यात आली. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि राज्य शासनाच्या महसूल विभागाबरोबरच विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण हटवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका वटवली. या जागेची पूर्वपीठिका अशी की विद्यापीठाने क्रीडा संकुल बांधण्यासाठी ७०.०९ एकर जमीन १९९२मध्ये राज्य शासनाला दिली होती. मात्र, त्यानंतर क्रीडा संकुल कोराडी मार्गावरील मानकापूरला हलवण्यात आले. त्यावेळी राज्य शासनाने विद्यापीठाला जागा हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे २६ एकर जागेवर नागरिकांनी घरे बांधून झोपडपट्टी वसवली. उर्वरित ४४ एकर जागा ३० मार्च २०१०ला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशानंतर नागपूर विद्यापीठाला पुन्हा मिळाली.

तारेचे कुंपण – कुलगुरू
कुलगुरू डॉ. सिद्धार्थ काणे म्हणाले, राजकीय इच्छाशक्तीशिवाय अतिक्रमण काढणे शक्य नव्हते. त्यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून विद्यापीठ प्रयत्न करीत आहे. आज दोन आणि सोमवारी चार अतिक्रमणे काढण्यात येणार असल्याचे राज्य शासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले. हे अतिक्रमण हटवण्यास स्थानिक प्रशासनाचे सहकार्य महत्त्वाचे आहे. अतिक्रमण हटवल्यानंतर तारेचे कुंपण केले जाईल.