१६ डिसेंबरपासून सुरू झालेल्या व सहा दिवस चाललेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची शनिवारी समाप्ती झाली.

या काळात विधानसभेच्या सहा बैठका झाल्या. त्यात ४७ तास २९ मिनिटे कामकाज झाले. मंत्री अनुपस्थित असल्यामुळे २० मिनिटे व अन्य कारणांमुळे दोन तास ३५ मिनिटे कामकाज होऊ शकले नाही. सभागृहाचे रोजचे सरासरी कामकाज ८ तास चालले. अधिवेशनात एकूण सात विधेयके संमत झाली. प्राप्त १०५७ लक्षवेधी सूचनांपैकी ७१ स्वीकृत झाल्या. पण, एकाही लक्षवेधीवर चर्चा झाली नाही. अधिवेशन काळात सदस्यांची उपस्थिती ८४.४० टक्के होती.

विधान परिषदेत सहा दिवसांत ३४ तास ३९ मिनिटे कामकाज झाले. रोजची सरासरी ५ तास २० मिनिट होते. नियम ९३ च्या २७ सूचना आल्या. त्यापैकी १५ स्वीकृत झाल्या. ७ सूचनांवर  निवेदन करण्यात आले.

प्राप्त ५०९ लक्षवेधी सूचनांपैकी १३९ स्वीकृत करण्यात आल्या व ३०वर चर्चा झाली. ११३ विशेष उल्लेख प्राप्त झाले. त्यापैकी ७८ मांडण्यात आले. शेतकऱ्यांसाठी दोन लाखांची कर्जमाफी ही या अधिवेशनातील लक्षवेधी घोषणा ठरली.