16 November 2019

News Flash

सलग दुसऱ्या दिवशीही ‘सव्‍‌र्हर डाऊन’चा फटका

अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया; सेतू केंद्रात गर्दी, पालकांचा मन:स्ताप

सेतू केंद्रावर झालेली विद्यार्थी व पालकांची गर्दी.

अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया; सेतू केंद्रात गर्दी, पालकांचा मन:स्ताप

मंगळवारपासून सुरू झालेल्या अभियांत्रिकी प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पहिल्याच दिवशी ‘सव्‍‌र्हर डाऊन’मुळे कोलमडल्यानंतर दुसऱ्या दिवशी तरी ती सुरळीत पार पडेल असा अंदाज होता. मात्र, दुसऱ्याही दिवशी दुपापर्यंत विद्यार्थ्यांना पुन्हा ‘सव्‍‌र्हर डाऊन’ चा फटका बसला. अनेक विद्यार्थ्यांना घरी परत जावे लागले तर काही विद्यार्थ्यांना तासन्तास बसूनही अर्ज भरता आला नाही.

अभियांत्रिकीसह विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली. अभियांत्रिकीकडे जाणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांनी त्यासाठी सीईटीने निर्धारित केलेल्या सेतू केंद्रात पहिल्याच दिवशी गर्दी केली होती. मात्र, ही प्रक्रिया विस्कळीत झाली. त्यामुळे सीईटीने प्रक्रिया थांबवून अर्ज भरण्याच्या मुदतीत एकदिवस वाढ केली. आज बुधवारी दुसऱ्या दिवशी सुरळीतपणे ही प्रक्रिया होईल, असे सेतू केंद्रातून सांगण्यात आले होते. मात्र बुधवारीही सकाळपासून दुपापर्यंत ‘सव्‍‌र्हर डाऊन’चा फटका विद्यार्थ्यांना बसला.

नागपुरातील काही सेतू केंद्रावर मुलांना सकाळी बोलवले होते. वर्धा मार्गावरील कमला नेहरू महाविद्यालयाच्या केंद्रावर समारे दोनशे ते तीनशे विद्यार्थी व पालकांची गर्दी झाली होती. यापैकी काही पहिल्या दिवशी गेलेले विद्यार्थी होते व त्यांना सकाळी बोलावले होते. पण ‘सव्‍‌र्हर डाऊन’ होते. त्यामुळे त्यांना परत पाठवून पुन्हा दुपारी १२ वाजता बोलावण्यात आले. त्यानंतरही नेटवर्क मिळत नसल्याने संथ गतीने काम होत होते. अध्र्या तासात होणाऱ्या कामासाठी विद्यार्थ्यांना तीन ते चार तास थांबावे लागले.

वर्धा मार्गावरील कमला नेहरू महाविद्यालयातील केंद्रावर पालकांची मोठी गर्दी झाली होती. अनेक पालकांनी यावेळी सेतू केंद्रातील कर्मचाऱ्यांवर संताप व्यक्त केला. त्यांनी सीईटीकडे बोट दाखवले. वर्धा मार्गावरीलच पलोटी अभियांत्रिकी महाविद्यालयातही विद्यार्थी सकाळी ८ वाजता पोहोचले. मात्र ‘सव्‍‌र्हर डाऊन’ असल्याने त्यांना परत फिरावे लागले.

गेल्यावर्षीपर्यंत अभ्यासक्रमनिहाय स्वतंत्र प्रवेश प्रक्रिया होती. तंत्रशिक्षण विभाग ही प्रक्रिया राबवत होता. यंदा शासनाने त्यांच्याकडून हे काम काढून राज्य सामाईक प्रवेश कक्षा (सीईटी सेल)कडे दिले. सुरू केली. या प्रणालीवरून विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी एकच अर्ज दाखल करायचा आहे. अर्ज किचकट असल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला आहे. सॉफ्टवेअरमध्ये वारंवार बिघाड होत आहे.

अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेविषयी माहितीपत्रक विद्यार्थ्यांना देणे गरजेचे असते. पण, ‘सार’वर कोणत्याही प्रकारचे माहितीपत्रक नाही. प्रवेशाच्या अधिसूचनेविषयी कोणतीही माहिती दिली जात नाही. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ही प्रवेश प्रक्रिया आपल्या अखत्यारित नाही, असे सांगून हात वर केले आहेत, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. दरवर्षी  प्रवेश प्रक्रियेत बदल केले जात असल्याने विद्यार्थ्यांचे

पालकही गोंधळून गेले आहेत. गेल्यावर्षी ज्या पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली, त्याविषयी माहिती काढून पालक प्रवेशाची तयारी करतात, पण, त्यांना यंदा  वेगळ्याच समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच तांत्रिक बिघाडाने अडचणींत भर टाकली आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सीईटी सेलने ८६५७५२४६७३ व ८६५७५२४६७४ हे दोन हेल्पलाईन क्रमांक दिले आहेत. परंतु तेथे संपर्कच होत नाही, अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे.

अमरावतीतही फटका

अमरावतीतही असाच प्रकार घडला. ‘सव्‍‌र्हर डाऊन’ असल्याने विविध केंद्रांवर प्रवेशासाठी पोहचलेल्या विद्यार्थी आणि पालकांना चांगलाच मन:स्ताप सहन करावा लागला. बुधवारी दुपारी तीन वाजेपर्यंत देखील इंटरनेट सेवा सुरळीत न झाल्याने विद्यर्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेबाबत रोष व्यक्त केला. शहरातील विविध अभियांत्रिकी, फार्मसी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या आणि विशेषत: बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला.

First Published on June 20, 2019 9:38 am

Web Title: engineering first year admission online process 2019