राज्यात विकासाला नवी दिशा देणाऱ्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी अभियांत्रिकी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संकल्पनांचा स्वीकार करून या महामार्गाची जागतिकस्तरावर नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नागपूरमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय पूल व बोगदे परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. पूल आणि बोगद्यांच्या निर्मितीसाठी सवरेत्कृष्ट रचना आणि आकर्षकतेच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय अभियंता परिषद, केंद्रीय महामार्ग निर्मिती विभाग, राज्य सार्वजनिक बांधकाम विभाग व भारतीय पूल व आभियांत्रिकी स्थापत्य अभियंता संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. बांधकाम निर्मितीमध्ये आकर्षकता असेल तर ती राज्याची ओळख ठरते. पूर्वी ‘गेट वे ऑफ इंडिया’ ही राज्याची ओळख होती. आता वरळी-वांद्र ‘सि-लिंकने त्याची जागा घेतली. समृद्धी महामार्गामुळे नागपूर-मुंबई हे अंतर केवळ आठ तासतात पूर्ण करता येणार आहे.

हा  प्रकल्प कृषी व उद्योग विकासासाठी समृद्धी कॅरिडोअर म्हणून विकसित केला जाणार आहे. या  प्रकल्पाचा आराखडा जागतिकस्तरावरील असावा यासाठी सर्व आभियांत्रिकी वास्तू विशारदांनी पुढाकार घेऊन अत्यंत सुंदर असा आराखडा तयार करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन फडणवीस यांनी केले. आधुनिक तंत्रज्ञानामुळे काश्मीरला जोडणारा बोगदा तसेच ब्रम्हपुत्र नदीवरील सर्वात मोठा पूल ही भारताची नवी ओळख आहे. मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वांद्रे-वर्सोवा हा नवा समुद्री पूल तयार करण्यात येणारआहे. नरिमन पॉईन्ट ते वरळी समुद्रमार्ग, ट्रान्स हार्बर या पुलांचे बांधकाम करताना सुरक्षा आणि सुंदरतेला प्राध्यन्य दिले जाणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, महामार्ग प्राधिकरणाचे सदस्य डी.ओ. तावडे, आय.के.पांडय़ा, तांत्रिक समितीचे अध्यक्ष ए.के. बॅनर्जी, डॉ.वर्षां सुब्बाराव, आर.के. पांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव अजित सगणे उपस्थित होते. परिषदेला जागतिकस्तरावरील तज्ज्ञ तसेच राज्याच्या विविध भागातून सुमारे ४५० प्रतिनिधी उपस्थित होते.

गडकरींचे कौतुक

देशातील रस्ते विकासासोबतच पूल व बोगद्यांच्या कामाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नवी दिशा दिली, अशा शब्दात फडणवीस यांनी गडकरी यांच्या कार्याचा गौरव केला. गडकरी यांच्यामुळेच अभियांत्रिकी कौशल्याला सुवर्णकाळ आल्याचे अखिल भारतीय अभियांत्रिकी संघटने त्यांच्या मानपत्रात नमूद केले.