इंग्रजी शाळांचे एकही पुस्तक ५० रुपयांच्या खाली नाही

शालेय पुस्तके, नोटबुकच्या किमतीलाही ‘जीएसटी’चा फटका बसला असून पालकांचे आथिर्क गणित बिघडले आहे. प्ले ग्रुप, नर्सरी, केजी-१, केजी-२, पहिली ते आठवीच्या नोटबुकवर दोन रुपये वाढले आहेत. नोटबुक आता साध्या एकरेघी, दुरेघी वह्य़ांपुरताच मर्यादित नाही. त्यांच्या किमती पाहिल्या की भोवळ यावी इतके ते महाग झाले आहेत. ७६ पानी नोटबुक २२ रुपये, तर १७६ पानी नोटबुकसाठी ४५ रुपये मोजावे लागत आहेत. पुस्तकांच्या किमतीने तर पालकांना रडकुंडीस आणले आहे. नर्सरी, केजी-१ आणि पुढील इयत्तांसाठी इंग्रजी शाळांमध्ये लागणारे एकही पुस्तक ५० रुपयांच्या खाली नाही. एनसीईआरटीईची पुस्तके आणि कॉन्व्हेंटच्या पुस्तकांच्या किमती तिपटीने जास्त आहेत. प्रकाशक, विक्रेते आणि त्यांच्याशी बांधील असलेल्या शाळांची यातून चांदी होत असली तरी हा सर्व भार पालकांच्या खिशावरच पडत आहे. यावर्षी पुन्हा प्रत्येक नोटबुकमागे दोन रुपयांची वाढ पालकांना सहन करावी लागत आहे. नर्सरीमध्ये ट्रेस बुक फारच महत्त्वाचे आहे. त्यात उभी रेषा, आडवी रेषा, अर्धवर्तुळ, तिरपी रेषा कशी काढायची, कशी गिरवायची यासाठीच्या वह्य़ा आहेत. त्यावरील किंमत २५ रुपये आहे. पहिली ते आठवीपर्यंतची पुस्तके आणि तेवढय़ाच नोटबुक्स, तपकिरी रंगाचा कागद आणि शाळांचे लेबल यांच्या किमती २२०० ते ३००० आहेत. त्यात पेन्सिल, पेन, शार्पनर, रेऑन्स, रंग, ब्रश, खोडरबरचा समावेश नाही. कारण या वस्तू अनेकदा विद्यार्थ्यांना लागत असल्याने शाळा शक्यतो या वस्तू देत नाहीत. गेल्यावर्षी १ जुलैला लागू करण्यात आलेल्या जीएसटीचे भूत पालकांसोबतच व्यावसायिकांनाही छळत आहे. पुस्तक व्यावसायिकांनी जीएसटी क्रमांक तर घेतले आहेत. मात्र, त्यांचा व्यवसाय २० लाखांच्यावर नसल्याने त्यांनी जीएसटी फाईल केले नाही. त्याचा ५० हजारांचा भरुदड बसत आहे. यामुळे व्यावसायिक त्रासले आहेत.

जीएसटी ‘रिटर्न’ भरणे फारच त्रासदायक ठरत आहे. जीएसटी क्रमांक घेतला मात्र, २० लाखांच्यावर धंदा नसूनही रिटर्न फाईल करावे लागते. जीएसटी, वॅट भरणे, आयकर भरला की नाही याचेच टेंशन राहते. एका खेडेगावात शालेय वस्तूंच्या विक्रीसाठी गेलो. ग्रामीण पालक शहरात येण्यापेक्षा आपणच त्यांच्यापर्यंत जावे हा उद्देश होता. ज्या शाळेच्या परिसरात आम्ही स्टॉल लावला होता, त्याठिकाणी एक लाखाच्यावर बिल झाले. त्यावर बँकेने आमच्याकडून १.२५ टक्के दराने जवळपास हजार रुपये कुठल्यातरी कराखाली कापले. सदर भागातील अनेक दुकानदार तर आता दुकान भाडय़ाने देऊन हा धंदा बंद करावा, या निर्णयाप्रत आले आहेत. एवढा त्रास या जीएसटीमुळे सुरू आहे.   – विनोद नांगिया, मालक, वेस्टर्न बुक डेपो

आमचा व्यवसाय तर २० लाखांच्यावर नाहीच. पुस्तकेही आम्ही चांगल्या गुणवत्तेची वापरतो. तेलंगणा, तामिळनाडूचे इंग्रजी चांगले आहे. त्यामुळे तेथील प्रकाशकांची पुस्तके मागवली आहेत. शिवाय नर्सरीसाठी उपयोगी पडणाऱ्या पॅटर्नच्या नोटबुक्सही तिथून मागवल्या आहेत. पालकांवर जास्त ताण येऊ नये, असे आमचे धोरण आहे. त्यामुळे दोन पैशांनी नोटबुक्स महाग मिळाल्या तरी आम्ही शुल्क वाढवलेले नाही. दुकानदार जीएसटीमुळे धनादेश घेत नाहीत. त्यांना रोख पैसेच द्यावे लागतात.  – प्रतिभा मेश्राम, संचालक, मदर टेरेसा कॉन्व्हेंट, बजरंगनगर