पंतप्रधानांचा लाहोर दौरा हा भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्यासाठी केलेला प्रयत्न असून त्याचे स्वागत असले तरी अखंड भारत होणे शक्य नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे महासचिव खासदार तारिक अन्वर यांनी व्यक्त केले.
नागपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. मोदी यांच्या दौऱ्याबाबत भाजप नेते राम माधव यांनी मांडलेल्या अखंड भारताच्या भूमिकेबाबत बोलताना ते म्हणाले, मोदी यांचा लाहोर दौरा परराष्ट्रनीतीचा एक भाग असून दोन्ही देशांचे संबंध सुधारण्याचे ते एक पाऊल आहे. यापूर्वी राजीव गांधी, अटलबिहारी वाजपेयी यांनी प्रयत्न केले होते. राम माधव यांनी केलेले विधान समर्थनीय नसून तसे विधान करण्याची ही वेळ नाही. दोन्ही देशांचे संबंध सुधारावेत यासाठी भारताचे प्रयत्न सुरू असले तरी पाकिस्तानवर दबाव आहे. भारत-पाकिस्तान एकत्र होऊ शकत नाही. संघाने किंवा भाजप नेत्यांनी अखंड भारताचे स्वप्न पाहणे चुकीचे नाही, मात्र ते होणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिहादच्या नावावर मुस्लीम युवकांना दहशतवादी संबोधणे ही चिंतेची बाब आहे. बिहारात कायदा व सुव्यवस्थेवर आता नियंत्रण मिळविले जात आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहार सरकार काही चांगले निर्णय घेत आहेत.
‘जेटलींनी राजीनामा द्यावा’
दिल्ली व जिल्हा क्रिक्रेट असोसिएशनसंदर्भात माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांनी केलेले आरोप गंभीर असताना त्याची कारणे शोधली पाहिजे. जेटली यांनी पदावर न राहता राजीनामा द्यावा, अशी मागणी अन्वर यांनी केली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी जेटली यांचे समर्थन केले असले तरी त्यांनी राजीनामा द्यावा, अशी माझी वैयक्तिक भूमिका असल्याचे अन्वर म्हणाले.