News Flash

धार्मिक स्थळांचे प्रवेशद्वार अखेर उघडले

पहिल्याच दिवशी भाविकांचे रांगेत दर्शन

(संग्रहित छायाचित्र)

करोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीमुळे आठ महिन्यांपासून बंद असलेली शहरातील सर्व धर्मीयांची प्रार्थनास्थळे दिवाळीच्या पाडव्याला नागरिकांसाठी खुली करण्यात आली.  कोराडीतील महालक्ष्मी मंदिर, टेकडीचा गणपती व साई मंदिरात दर्शनासाठी भक्तांनी रांगा लावत दर्शन घेतले. साई व आग्याराम देवी मंदिरात सकाळी आरतीनंतर दर्शनासाठी भाविकांना आत सोडण्यात आले. आठ महिन्यांपासून बंद असलेली प्रार्थनास्थळे आज पहिल्याच दिवशी गजबजली होती.

राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी सर्व प्रार्थनास्थळे खुली करण्याचा निर्णय घेतला. यानंतर  शहरातील विविध मंदिरामध्ये शासनाच्या दिशानिर्देशानुसार तयारी करण्यात आली होती. यानंतर सकाळपासून भाविकांना एक एक करत दर्शनासाठी मंदिरात सोडण्यात आले. टेकडी गणेश मंदिरात सकाळीची आरती काही निवडक भाविकांच्या उपस्थित झाली. त्यानंतर एकावेळी दोन व्यक्तींना आत सोडले जात होते. मंदिरात सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली होती. मुखपट्टी लावल्याशिवाय प्रवेश दिला जात नव्हता. वर्धा मार्गावरील साई मंदिरात सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी  रांग लावली होती. येथे सकाळच्या आरतीनंतर मंदिरात प्रवेश देण्यात आला. कोराडीच्या महालक्ष्मी मंदिरात माजी मंत्री व मंडळाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. त्यानंतर मोठय़ा प्रमाणात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्यामुळे मंदिरात सामाजिक अंतर पाळण्यात आले नाही.

ताजबाग, चर्च, गुरुद्वाराही गजबजले

उमरेड मार्गावरील मोठा ताजबाग, सदरमधील ऑल सेंट कॅथ्रेडल चर्च तर कामठी मार्गावरील गुरुद्वारा भाविकांसाठी आजपासून सुरू करण्यात आले असून या ठिकाणी भाविकांनी दर्शन घेतले. मोठा ताजबागमध्ये सकाळी सामाजिक अंतर ठेवत सामूहिक प्रार्थना करण्यात आली. सर्वच ठिकाणी नियमांचे पालन करण्यासाठी सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्यात आली आहे.

टेकडी गणेश मंदिरात शिवसेनेची महाआरती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व धार्मिक स्थळे सुरू करण्याचा घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करत शहर शिवसेनेच्यावतीने संपर्क प्रमुख दुष्यंत चतुर्वेदी व महानगर प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्या उपस्थितीत शेकडो शिवसैनिकांनी टेकडी गणेश मंदिरात महाआरती केली. गणपती बाप्पा मोरया, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत परिसर दुमदुमला.  सूर्यनगरातील दुर्गा मंदिर, गरीब नवाज नगरातील शीतला माता मंदिरात, तेलंगखेडीतील हनुमान मंदिरात महाआरती करत शिवसेनेने आनंदोत्सव साजरा केला. यावेळी शिवसैनिकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केल्यामुळे सामाजिक अंतर पाळण्यात आले नाही. तेव्हा मंदिर विश्वस्तांनी गर्दी करू नका, असे आवाहन केले.

दुकानेही उघडली

धार्मिक स्थळे बंद असल्याने सर्व या परिसरातील दुकानेही आठ महिन्यांपासून बंद होती. त्यामुळे अनेकांचा रोजगार बुडाला होता. मात्र आज सकाळी धार्मिक स्थळे सुरू झाल्यानंतर हार फुलासह प्रसादाची व अन्य दुकाने थाटण्यात आली. त्यामुळे मंदिर परिसर गजबजला.

भाजपकडून आनंदोत्सव साजरा

भारतीय जनता पक्षाच्यावतीने शहरातील साई मंदिर, आग्याराम देवी , पारडीतील भवानी मंदिरात शहर अध्यक्ष प्रवीण दटके, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे यांच्या उपस्थितीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या पक्षाने राज्यातील विविध धर्माची  प्रार्थनास्थळे सुरू करण्यासाठी आंदोलन केले होते. त्या दबावात सरकारने निर्णय घेतला असल्याचे श्रेय घेत भाजपने ढोलताशांच्या गजरात आणि साईबाबांचा जयजयकार करत आनंदोत्सव साजरा केला. ठिकठिकाणच्या मंदिरात भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

दीक्षाभूमीत अनुयायांना आजपासून प्रवेश

आठ महिन्यांपासून बंद असलेली दीक्षाभूमी उद्या, मंगळवारला सकाळी ९.३० वाजतापासून अनुयायांसाठी खुली करण्यात येत आहे. करोनासंबंधित सर्व नियमांचे काटेकोर पालन करूनच प्रवेश दिला जाईल. अनुयायांनी यापुढेही सहकार्य करावे, असे आवाहन स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत सुरेई ससाई यांनी केले आहे.दीक्षाभूमीत प्रवेश देताना नियमांचे काटेकोर पालन करण्यात येईल. अनुयायांना मुखपट्टी अनिवार्य आहे. ऑक्सिमीटरने शरीरातील प्राणवायूची मात्रा तपासणे, थर्मल मशीनने तापमान मोजणे, यानंतर सॅनिटायझरने हातांची स्वच्छता आवश्यक आहे. स्मारक समिती सदस्य वा तैनात सुरक्षा रक्षकांशी निष्कारण वाद करू नये, १० वर्षांखालील मुले व ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि सर्दी, खोकला, ताप यासह करोनाची लक्षणे असणाऱ्या नागरिकांना प्रवेश दिला जाणार नाही. अनुयायांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन समितीने केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2020 12:00 am

Web Title: entrances to the religious sites finally opened abn 97
Next Stories
1 ‘वॉकर’च्या निमित्ताने कॉरिडॉरचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
2 वीज कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा
3 समाजकार्य पदवीधारकांची कोंडी
Just Now!
X