उद्योजक प्रमोद मानमोडे यांनी उभारले तयार कपडय़ांचे नवे युनिट 

नागपूर :  टाळेबंदीमुळे  हजारो कामगारांचा रोजगार  गेला. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. ही बाब लक्षात घेऊन नागपूरचे प्रसिद्ध उद्योजक प्रमोद मानमोडे यांनी कोटय़वधींचा खर्च करून पीएनजी कॉर्पोरेशन रेडिमेड गारमेंटचे एक नवे युनिट सुरू केले आणि तेथे पहिल्याच प्रयत्नात तब्बल ३०० जणांना रोजगार दिला. त्यामुळे उद्योग वर्तुळातून मानमोडे यांचे अभिनंदन केले जात आहे.

करोना महामारीमुळे तीन महिने टाळेबंदी जाहीर झाली. याच काळात मानमोडे यांनी कोंढाळीजवळ तयार कपडे बनवण्याचे नवे युनिट सुरू केले. पीएनजी कॉर्पोरेशन रेडिमेड गारमेंटच्या या युनिटमध्ये महिला, पुरुषांसह लहान मुलांसाठी तयार कपडे बनवण्यात येत असून हा प्रकल्प प्रामुख्याने गरीब कुटुंबातील महिलांना रोजगार देणारा अणि त्यातही विधवा-घटस्फोटित महिलांना करोनाकाळात मोठा आधार ठरला आहे. जपान आणि तायवानहून अद्ययावत यंत्रे मागवण्यात आली. मानमोडे यांच्या निर्मलनगरीत त्या यंत्राची जुळवणी करण्यात आली.

अमरावती मार्गावर असलेल्या युनिटमध्ये यंत्र नेण्यात आले आणि तेथे संगणकीकृत पद्धतीने कापडाचे कटिंग, शिवणकाम आणि फिनििशगचे काम शेकडो महिलांना देण्यात आले. या प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे-पीएनजी कॉर्पोरेशनने आपल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आणि प्रशिक्षणाच्या काळात आर्थिक मोबदलाही दिला. अल्प काळात त्या कर्मचाऱ्यांना अद्ययावत यंत्रांवर काम करता यावे यासाठी दिवसरात्र तज्ज्ञांच्या मदतीने मेहनत घेण्यात आली. येथे शर्ट्स, टी शर्टस, नाईट शर्टस, टेरी टॉवेल, बेडशीट्स, लेगिंग्ज, हुडीज, बाथरोब हे सगळे टप्प्याटप्प्याने आणि मिलीमीटरच्या मोजमापाने  बारकाईसह तयार होतात. महत्त्वाचे म्हणजे, हे कपडे दर्जेदार असतील आणि कोणत्याही ब्रँडपेक्षा बरेच स्वस्त असतील याकडे लक्ष देण्यात आले. मात्र, दर्जाच्या बाबतीत कोणतीही तडजोड आम्ही स्वीकारली नाही, असे प्रमोद मानमोडे यांनी सांगितले. आता किंग्ज अँड बेरी या ब्रँडनेमसह पीएनजी कॉर्पोरेशन एका नव्या विश्वात पदार्पण करीत आहे. पूर्णत: कॉर्पोरेट शैलीने बाजारात जायचे, असे पीएनजीने ठरवले आहे. पुढच्या काळात अमरावती मार्गावरील प्रकल्पात भव्य गारमेंट झोन उभारला जाणार असून, तेथे ३० हजार कपडे रोज तयार करण्याची क्षमता असेल. एकूण ५०० यंत्रे तेथे बसवली जाणार आहेत. ऑनलाईन, रिटेलसह फॅक्ट्री आऊटलेटही उभारले जाईल. भविष्यात फायबर टू फॅशन या दिशेने जायचे आणि हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा, हे पीएनजी कॉर्पोरेशनचे मिशन असल्याचे प्रमोद मानमोडे यांनी स्पष्ट केले.