नितीन गडकरींच्या आवाहनाला प्यारे खान, नितीन खारा, निखिल गडकरींचा प्रतिसाद

नागपूर : शहरातील करोनाची  स्थिती अतिशय वाईट आहे. या कठीण काळात शहरातील उद्योजकांनी  मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील प्रसिद्ध उद्योजक नितीन खारा, प्यारे खान, निखिल गडकरी, अंकुर सिड्ससह अनेकांनी कोटय़वधींची मदत देऊ केली आहे.

गडकरी यांनी आपल्या आवाहनात  थेट पशांची मदत न करता आम्ही जे काही आरोग्याशी निगडित व प्राणवायू संदर्भात यंत्र सामुग्री विकत घेत आहोत त्यांनाच आपण थेट पसे द्यावे, असे उद्योजकांना सांगितले होते. यासंदर्भात माझ्या कार्यालयाकडून सर्व तपशील आपण जाणून घेऊ शकता असेही ते म्हणाले होते. त्यांच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळाल्याने  त्यांनी मदतीचा हात पुढे करणाऱ्या उद्योजकांचे धन्यवाद मानले आहेत.  शहरातील गो गॅसचे संचालक व प्रसिद्ध उद्योजक नितीन खारा यांनी एक हजार सिलेंडर दिले असून यामध्ये प्राणवायू आणण्यात येणार आहे. हे सिलेंडर दहेज येथून शहरातील रुक्मिणी मेटल्स येथे येतील व त्यामध्ये प्राणवायू भरण्यात येईल व ते करोना रुग्णांसाठी उपलब्ध करण्यात येतील. तसेच मालवाहतूक क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक प्यारे खान यांनी पन्नास लाखांची मदत केली आहे. गडकरी यांचे चिरंजीव व उद्योजक निखिल गडकरी यांनी देखील त्यांच्या समूहातर्फे पन्नास लाखांची मदत देण्याचे कबूल केले आहे. या जमलेल्या पशांमध्ये आरोग्यसेवेसाठी लागणारी सर्व यंत्रणा विकत घेण्यात येणार असून त्याला थेट लाभ नागपूरकरांना होणार आहे. उद्योजकांनी केलेल्या मदतीच्या स्वरूपाला त्यांच्या तर्फेच  नाव देण्यात येईल, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आम्ही एक हजार प्राणवायू सिलेंडरची मदत करत आहोत. नागपुरात सध्या प्राणवायूची मोठी समस्या आहे. त्यामुळे येथील नागरिकांना प्राणवायू मिळण्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे.

– नितीन खारा, संचालक, गो गॅस.

अशा संकटाच्या काळात सर्वानीच मदतीसाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे, याच भावनेतून आणि  गडकरींच्या आवाहनाला प्रतिसाद देत मी पन्नास लाखांची मदत दिली आहे.

– प्यारे खान, प्रसिद्ध वाहतूक व्यवसायी.