X

मतदार याद्यांमध्ये घोळ; भाजपचे निवेदन

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर झाल्यावर नाव नोंदणीसाठी आवश्यक अर्ज  केंद्रावर स्वीकारण्यासाठी अधिकारी अनुपस्थित राहतात. त्यामुळे त्यांची तात्काळ व्यवस्था करावी, या मागणीसह मतदार याद्याच्या घोळाबाबत भारतीय जनता पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. याद्यामध्ये असलेला घोळ बघता भाजपचे शहर अध्यक्ष सुधाकर कोहळे आणि आमदार सुधाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले व मतदार यादीबाबत चर्चा केली. एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या बुथवरील मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. भूखंड क्रमांकानुसार यादी नसल्यामुळे राजकीय पक्ष आणि सरकारी यंत्रणेला त्याचा त्रास होत आहे.

गेल्या पंधरा वर्षांत आयोगाद्वारे मतदारांच्या घरी जाऊन संपूर्ण पुनर्निरीक्षण करण्यात आले नाही. सहाही विधानसभा मतदारसंघाच्या यादीत अनेक त्रुटी आहेत. मतदारांची नावे चुकीची मतदार यादीत असतात ती अर्ज देऊनही दुरुस्त केली जात नसल्याची तक्रार कोहळे यांनी केली. नव्याने सुरू करण्यात आलेल्या नोंदणीसाठी नमुना क्रमांक सहा नव्याने तयार करण्यात आला असून तो अडचणीचा ठरत आहे.

त्यामध्ये सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेत लवकरच केंद्र मतदार अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात येऊन त्यांना सूचना देण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी शिष्टमंडळाला दिले.

यावेळी सुधीर देऊळगावकर, सत्तापक्षनेते संदीप जोशी, माजी महापौर प्रवीण दटके, मोहन भंडारी, रूपा राय, जयप्रकाश गुप्ता, विकास कुंभारे आदी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.