नागपूर रेल्वेस्थानकावरील धक्कादायक प्रकार

प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा सुरक्षित असणे बंधनकारक असताना नागपूर रेल्वेस्थानकावरील फिरत्या जिन्याचे नियत्रंण चक्क पुस्तक विक्रेत्याचे हाती असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रेल्वेस्थानकावर प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा पुरवण्यात येत आहेत. यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे, परंतु हे तंत्रज्ञान वापरताना खबरदारीच्या उपाययोजनांकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.  नागपूर रेल्वेस्थानकावर प्रवाशांच्या सोईकरिता चार फिरते जिने बसवण्यात आले आहेत. जिन्याला सेंसर असल्याने व्यक्ती जवळ येताच ते सुरू होते. शिवाय ते बंद करण्यासाठी तेथे कळ पण देण्यात आली आहे.

ज्यांना फिरत्या जिन्याचा उपयोग केवळ साध्या जिन्यासारखे करायचा असेल तर ही कळ दाबावी लागते. तसेच चावी लाबून जिने बंद-चालू करता येते. रेल्वे स्थानकावरील पुस्तक विक्रते, फळविक्रेते आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी हे जिने आपल्या मनमर्जीप्रमाणे वापरावे म्हणून चक्क बनावट चावी बनवल्याचे समोर आले आहे. हा प्रकार उघडकीस येण्यास भाजपच्या नेत्या उमा भारती यांचा नागपूर दौरा कारणीभूत ठरला. फिरत्या जिन्याचा वापर करायचा नव्हता. त्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी जिना बंद करण्याची कळ दाबली, परंतु पुस्तक विक्रेत्याने त्याच्या कडील चावीने जिना सुरू केला.

याची कल्पना उमा भारती आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना नव्हती. त्यामुळे जिना अचानक सुरू झाल्याने तोल गेला, पण त्या वेळीच सावरल्याने बचावल्या. परंतु रेल्वे अधिकाऱ्याने या प्रकाराला फार गांभीर्याने घेतल्याचे दिसून येत नाही. जिना योग्यप्रकारे संचालित न झाल्यास प्रवाशांना धोका होऊ शकत असल्याची कल्पना असतानाही पुस्तक विक्रेत्याने बनावट चावी बनवली कशी, असा सवाल उपस्थित होत आहे. सूत्रानुसार बऱ्याच दिवसांपासून फळ विक्रेते आणि पुस्तके विक्रेते यांच्या मर्जीप्रमाणे हे फिरणे जिने संचालित होते. या जिन्यांवर देखरेख ठेवण्यासाठी रेल्वे कर्मचारी नेमला आहे.

तरी देखील हा प्रकार सुरू होता, परंतु त्यासाठी अजूनही कोणालाही जबाबदार धरण्यात आलेले नाही.  रेल्वे प्रवाशांना स्थानकावरील एका फलाटावर दुसऱ्या फलाटावर ये-जा करणे सोपे व्हावे म्हणून फिरते जिन्यांचा बसवण्यात आले, परंतु या जिन्यांची सुरक्षा धोक्यात आली असून त्यामुळे प्रवाशांची जीव देखील सुरक्षित नाही, असे भारतीय यात्री केंद्राचे अध्यक्ष बसंत कुमार शुक्ला यांनी सांगितले. तसेच या जिन्यांच्या योग्य वापर न झाल्यास तोल जावून प्रवाशाच्या जीवावर बेतण्याची शक्यता असते. एका शॉपिंग मॉलमध्ये असा प्रकार घडला आहे. तेव्हा नागपूर स्थानकावरील बनावट चावी देणाऱ्याविरुद्ध कारवाईची झाली पाहिजे, असेही शुक्ला म्हणाले.

अजनीतही फिरते जिने

नागपूर स्थानकावर चार फिरते जिने बसण्यात आले आहेत. दोन जिन्यांचे काम सुरू असून आणखी चार फिरते जिने मंजूर झाले आहेत. तसेच अजनीला दोन फिरत्या जिन्यांचे काम सुरू आहे.