निकाल खोळंबले

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात बी.एस्सी. परीक्षेचा निकाल अद्याप घोषित व्हायचा असून मूल्यांकनच न झाल्याने हजारो विद्यार्थ्यांचे निकाल खोळंबले असून दुसरीकडे नियमित प्राध्यापकांनी मूल्यांकन करावे की अध्यापन करावे, असा त्यांच्यापुढे पेच पडला आहे.

विद्यापीठात ६५० च्यावर महाविद्यालये आहेत. त्यामुळे मोठय़ा संख्येने प्राध्यापक असणे ओघाने आलेच. पण सर्वच प्राध्यापकांना मूल्यांकनाच्या कामासाठी लावू शकत नसल्याने जेवढे उपलब्ध होतील. तेवढय़ाच प्राध्यापकांना घेऊन मूल्यांकनाची प्रक्रिया परीक्षा विभागाला पार पाडावी लागते. पदवीपूर्व परीक्षांना सेमिस्टर पॅटर्न लागू केल्यानंतर बी.एस्सी.ची ही पहिलीच तुकडी आहे. बी.एस्सी.ला एकूण सहा सेमिस्टर असल्याने सहा परीक्षा विद्यापीठाने घेतल्या आहेत. या परीक्षेच्या प्रात्यक्षिक परीक्षा ३० जुलैपर्यंत सुरू होत्या. त्यानंतर मूल्यांकन होऊन निकाल जाहीर व्हायला सुरुवात झाली आहे.

बी.एस्सी.(शिक्षण) नियमित अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर झाला असून बी.एस्सी.च्या पाचव्या सत्राचे मूल्यांकन होऊन त्याचा निकाल दोन-तीन दिवसात जाहीर होईल. सहाव्या सत्राचे मूल्यांकन आटोपले असून त्याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या सत्राचे निकाल जसजसे मूल्यांकन होईल, तसतसे लावले जातील, असे परीक्षा नियंत्रक डॉ. नीरज खटी यांनी सांगितले.

वर्धा, भंडारा किंवा गोंदियातून येणारे काही प्राध्यापकांचे घर नागपुरात असल्याने येथे मूल्यांकनाला महाविद्यालयाची परवानगी घेऊन जेव्हा येतात तेव्हा मूल्यांकनाऐवजी इतर कामे ते आटोपत असतात. असे प्राध्यापक महिनोंमहिने महाविद्यालयातून गायब असतात. त्यामुळे त्यांचे अध्यापनाचे काम कोणी करायचे, असा प्रश्न उपस्थित करून प्राचार्य प्राध्यापकांना मूल्यांकनासाठी सोडत नाहीत. तर परीक्षा नियंत्रक नियमित प्राध्यापकांशिवाय निकाल लावू शकत नाही. कारण मूल्यांकनाला तेच प्राध्यापक हवेत. अशी एकंदरीत अडचण असून त्यात विद्यार्थी विनाकारण भरडला आहे. कारण पदवीचे निकाल जाहीर झाल्याशिवाय त्याला पदव्युत्तर विषयांना प्रवेश घेता येत नाही, अशी ती अडचण आहे.

बी.एस्सी.चा निकाल ऑगस्टच्या शेवटच्या आठवडय़ात शक्य

बी.एस्सी.च्या प्रात्यक्षिक परीक्षा ३० जुलैपर्यंत पार पडल्या. त्यामुळे प्राध्यापक तेथे व्यस्त असल्याचे कारण सांगतात. सहाव्या सत्राचा निकाल जाहीर झाला असून पाचव्या सत्राचा निकालही तीन-चार दिवसांमध्ये जाहीर करण्यात येईल. प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षांचे मिळून ७० हजार विद्यार्थी आहेत. प्राध्यापक कमी असल्याने अद्यापही १५ हजार विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन व्हायचे बाकी आहे. त्यामुळे बी.एस्सी.च्या संपूर्ण सत्रांचे निकाल ऑगस्टच्या शेवटच्या आठवडय़ात लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विज्ञान विद्याशाखेच्या प्राध्यापकांची आज बैठक

मूल्यांकन होत नसल्याने निकाल लावण्यास अडचण येत आहे. बी.एस्सी.ला विद्यार्थी मोठय़ा प्रमाणात असतात. त्यातुलनेत मूल्यांकन वेगाने होत नाही. अभ्यासमंडळाचे अध्यक्ष आणि सदस्य यांना ३२/५ समिती अंतर्गत नियमित मान्यताप्राप्त शिक्षकांची यादी परीक्षा विभागाला देत असते. त्याच यादीतून प्राध्यापकांना मूल्यांकनासाठी बोलवावे लागते. ही प्राध्यापक ज्या महाविद्यालयात आहेत, त्यांचे प्राचार्य मूल्यांकनासाठी प्राध्यापकांना पाठवायला तयार नसतात. नाहीतर अध्यापन, अभ्यासक्रम  कसे पूर्ण होईल, असा त्यांचा प्रश्न असतो. या सर्व गोष्टींचा ऊहापोह करण्यासाठी उद्या, २० ऑगस्टला विज्ञान विद्याशाखेच्या प्राध्यापकांची बैठक परीक्षा विभाग नियंत्रक डॉ. नीरज खटी यांनी बोलावली आहे.