शहराच्या काही भागात मकर संक्रांतीच्या दिवशी मोठय़ा प्रमाणावर पतंग उडतात. निष्काळजीपणे पतंग उडवणाऱ्यांचा मांजा वाहन चालवणाऱ्याच्या गळ्यात अडकल्यास त्याला गंभीर दुखापत होण्याची शक्यता असते. या घटनांत वाहन चालकाचा तोल जावून अपघातही वाढतात. शहरात प्रत्येक वर्षी संक्रांतीच्या दिवशी वेगवेगळ्या अपघातात वीसच्या जवळपास मृत्यू व मोठय़ा संख्येने नागरिक जखमी होतात. त्यांना त्वरित उपचार मिळावा म्हणून मेडिकल, मेयो व डागा रुग्णालयांत १५ खाटा आरक्षित करण्यात आल्या असून खासगी रुग्णालयेही उपचारासाठी सज्ज झाली आहेत.
शहराच्या बहुतांश भागात प्रत्येक वर्षी मोठय़ा प्रमाणावर पतंग उडताना दिसतात. संक्रांतीच्या दिवशी या भागात पतंग उडवण्यासह ते कापण्याची जणू स्पर्धाच असते. मकर संक्रांतीच्या पर्वावर पतंग उडवण्याकरिता बरेच शासकीय वा खासगी संस्थांत सेवा देणारे हजारो कर्मचारी सुट्टी घेतात. या दिवशी बरेच जण रस्त्याच्या किनाऱ्यावर वा निष्काळजीपणेही पतंग उडवताना दिसतात. त्यात काही पतंग उडवणारे बंदी असतांनाही नायलॉन मांजाचा सर्रास वापर करताना दिसतात. हा मांजा शहरात वाहन चालवणाऱ्या नागरिकांच्या गळ्यात अडकल्यास ते जखमी होतात. सोबत या प्रकारांनी शहरात वाहन धारकांचा तोल जावून अपघातही मोठय़ा प्रमाणावर वाढतात.
तुटलेले पतंग पकडण्यासाठी रस्त्याने मोठय़ा प्रमाणावर मुले पळत सुटत असल्यानेही अपघाताच्या घटना मोठय़ा प्रमाणावर घडतात. या जखमींना तातडीने जवळच्या शासकीय वा खासगी रुग्णालयांत हलवल्या जाते. अचानक वाढणाऱ्या रुग्णांची संख्या बघता मेडिकल, मेयोसह डागा रुग्णालयांत सुमारे १५ खाटा अशा रुग्णांकरिता आरक्षित करण्यात आल्या आहेत. या तिन्ही शासकीय रुग्णालयात आवश्यक शस्त्रक्रियेच्या साहित्यांसह औषध खरेदी झाली असून डॉक्टरांची संख्याही वाढवण्यात आली आहे. तिन्ही सरकारी रुग्णालयांत प्रसंगी सुट्टीवर असलेल्या डॉक्टरांनाही संस्थेत वेळ पडल्यास हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. खासगी रुग्णालयांतही अशा रुग्णांना हाताळण्याकरिता पर्याप्त व्यवस्था करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

वीज कंपन्याही सज्ज
मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग पकडण्याकरिता मुले मोठय़ा प्रमाणावर रस्ते, इमारती वा वेगवेगळ्या भागात पळत सुटतात. गेल्या वर्षी पतंग पकडण्याच्या नादात दोनजणांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. यंदा अपघात टाळण्याकरिता वीज कंपन्या सज्ज झाल्या असून त्यांनी बऱ्याच भागात कर्मचाऱ्यांना आवश्यक काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.