जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांची माहिती; लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

ईव्हीएम, सीसीटीव्ही आणि डीव्हीआरच्या सुरक्षेची यावेळी अधिक काळजी घेतली जाईल. त्यासाठी विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक करून नियमित तपासणी केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली.

ठाकरे यांनी गुरुवारी लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट  दिली. यावेळी त्यांनी मतदान प्रक्रिया तसेच निवडणूक प्रक्रियेवर लोकांचा विश्वास अधिक वाढावा यासाठी सुरू असलेल्या कामांचीही माहिती दिली. लोकांनी निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले. लोकसभा निवडणुकीच्यावेळी ईव्हीएम सुरक्षा, सीसीटीव्ही आणि डीव्हीआर चोरीचा मुद्दा गाजला होता. गैरसमजामुळे काही प्रश्न निर्माण झाले होते. मात्र त्यामुळे निवडणूक प्रक्रियेवर शंका निर्माण होऊ नये म्हणून यावेळी यासंदर्भात अधिक दक्षता बाळगली जात आहे.  जास्तीत जास्त तपासणीकरिता सहायक निवडणूक अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी वेळापत्रक तयार केले जाईल. सीसीटीव्ही, डीव्हीआरवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांची मदत घेतली जाईल. ईव्हीएम गोदामातून बाहेर काढण्यापासून तर प्रत्यक्षात मतदान केंद्रावर नेण्यापर्यंत आणि त्यानंतर मतमोजणीस्थळी आणण्यापर्यंत सर्व प्रक्रिया निवडणूक आयोगाने ठरवून दिल्या असून त्यानुसारच त्या पार पाडल्या जातात. मतदानापूर्वी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींपुढे यंत्राची चाचणी होते आणि मतमोजणीच्या वेळीही यंत्राचे सिल काढताना राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित राहतात. सर्वच प्रक्रिया पारदर्शक असते. तरीही यावेळी यासाठी लागणारी संपर्क यंत्रणा अधिक सतर्क केली जाईल, असे ठाकरे यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांवर निवडणूक कामाचा ताण येऊ नये, यासाठी प्रयत्न केले जात आहे. महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्याच मतदारसंघातील केंद्र दिले जाणार आहे. केंद्रावर कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध राहाव्या असा प्रयत्न आहे. मुळात एका केंद्रावर काम करणारे कर्मचारी विविध विभागातील असतात. त्यातील प्रत्येकाची परस्परांशी ओळख सुद्धा नसते.  कामात चुका होऊ नये याचा ताणही असतोच. परंतु सुयोग्य पद्धतीने हे काम केल्यास ते ताणविरहित होऊ शकते, याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले.

ईव्हीएम पारदर्शकच

ईव्हीएमद्वारे मतदान प्रक्रिया ही शतप्रतिशत पारदर्शक आहे. यात कुठलीही हेरफेर शक्य नाही, वेळोवेळी तपासणीतून ही बाब सिद्ध झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानेही याबाबतीतला संभ्रम दूर करण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले आहे, असे ठाकरे म्हणाले.

मतदानाचा टक्का वाढावा

रामटेकच्या तुलनेत नागपूर लोकसभा मतदारसंघात २५ टक्के केंद्रांवर मतदान कमी झाल्याचे दिसून आले होते.त्या भागात मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून विशेष प्रयत्न केले जात आहे. जास्तीत जास्त तरुणांनी मतदार नोंदणी करावी म्हणून विशेष मोहीम राबवण्यात आली असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसादही लाभला आहे, असे ठाकरे म्हणाले.

मतदार यातीतील त्रूटी दूर करण्याचा प्रयत्न

लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदार यादीत नाव नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्या आधारावर याद्या दुरुस्त करण्यात आल्या आहेत. मतदारांनीही त्यांचे नाव यादीत आहे किंवा नाही, याची तपासणी करायला हवी. स्थलांतरित किंवा दुसरीकडे राहण्यासाठी गेले असेल तर तशी नोंद निवडणूक शाखेत करावी, ही वर्षभर चालणारी प्रक्रिया आहे, असे ठाकरे म्हणाले.

मतचिठ्ठय़ा वाटप सुरू

मतदान केंद्र व मतदार क्रमांक याची माहिती असणाऱ्या मतचिठ्ठय़ा मतदारांना त्यांच्या घरी पोहचवून देण्याचे काम गुरुवारपासून सुरू झाले असून लोकांपर्यंत या चिठ्ठय़ा पोहचाव्या अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत ज्या भागातून याबाबत जास्त तक्रारी आल्या होत्या, त्यात लक्ष घालून उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत.