नागपूरमध्ये प्रेमप्रकरणातून एका तरुणाने दुचाकीवरुन जाणाऱ्या २२ वर्षांच्या तरुणीला व तिच्या मित्राला कारने उडवल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून वाहनचालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

नागपूरमधील गणेशपेठ परिसरात राहणाऱ्या मयूरी हिंगणेकर (वय २२) या तरुणीची शुभम साळवे या तरुणाशी ओळख झाली होती. या ओळखीचे रुपांतर प्रेमसंबंधांमध्ये झाले. मात्र, काही महिन्यांपूर्वी मयूरी आणि शुभममध्ये वाद झाले. यानंतर मयूरीने शुभमपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. याचा राग शुभमच्या व त्याचा भाऊ अनिकेतच्या मनात होता. याच काळात मयूरीची अक्षय नगरधने (वय २२) या तरुणाशी ओळख झाली होती.

मयूरीच्या वडिलांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले असून शनिवारी श्राद्धाचा कार्यक्रम होता. कार्यक्रमानंतर मयूरी अक्षयला भेटण्यासाठी गेली. रात्री दोघेही व्हरायटी चौकात चहा पिण्यासाठी थांबले असताना शुभमचा भाऊ अनिकेत व त्याचे तीन मित्र तिथे कारमधून पोहोचले. त्यांच्यात व मयूरीत वाद झाला. शेवटी मयूरी व अक्षय तिथून दुचाकीवरुन निघाले.
अनिकेत व त्याच्या साथीदारांनी कारमधून अक्षय व मयूरीचा पाठलाग करायला सुरुवात केली. त्यांनी दोघांना मारहाणीचा प्रयत्न देखील केला. गणेशपेठ पोलीस ठाण्याजवळ आले असताना कारने दोघांना धडक दिली. यानंतर मयूरी व अक्षय दुभाजकावर पडले. यात मयूरी गंभीर जखमी झाली होती. पोलीस ठाण्यापासून काही अंतरावरच ही घटना घडल्याने पोलीस तातडीने तिथे पोहोचले. पोलिसांना पाहताच अनिकेत व त्याच्या साथीदारांनी तिथून पळ काढला. रुग्णालयात उपचारादरम्यान मयूरीचा मृत्यू झाला. तर अक्षयवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलिसांनी या प्रकरणी अनिकेत साळवे, मोहित मनोहर साळवे, आशीष साळवे व दीपक भुले या चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून यातील अनिकेतला पोलिसांनी अटक केली आहे.