क्षमता तपासणार

महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाकडून इच्छुकांच्या मुलाखती झाल्यानंतर सक्षम उमेदवारांची निवड करताना शहरातील आमदारांचा कस लागणार आहे. ज्या आमदारांच्या मतदारसंघातून नगरसेवकांची संख्या कमी असेल, भविष्यात अशा आमदारांच्या नेतृत्वावर आणि लोकप्रियतेवर प्रश्नचिन्ह उमटणार आहे. महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप पक्षश्रेष्ठींतर्फे आमदारांच्या लोकप्रियतेची क्षमता तपासली जाणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्यावेळी सहा विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार निवडून आल्यानंतर आता महापालिकेच्या निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघातून किमान ३०० पेक्षा अधिक इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. निवड समितीमध्ये शहरातील सहाही आमदारांचा समावेश असल्यामुळे इच्छुकांमध्ये आमदारांच्या समर्थकांची संख्या जास्त आहे. प्रत्येक आमदाराने आपापल्या समर्थकांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेनेशी युती तुटल्याने भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढणार असल्यामुळे प्रत्येक आमदाराला आपल्या मतदारसंघातील प्रभागांकडे लक्ष केंद्रित करण्याचे आदेश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ असलेल्या दक्षिण-पश्चिमची जबाबदारी मुख्यमंत्र्याचे खंदे समर्थक शहराचे सरचिटणीस संदीप जोशी आणि आमदार परिणय फुके यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच आमदारांना जास्तीत जास्त वेळ आपल्या मतदारसंघात देऊन जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी दिल्यामुळे येणाऱ्या दिवसात महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आमदारांची परीक्षा आहे. शहरातील सहाही मतदारसंघात भाजपचे वर्चस्व आहे. आमदाराच्या या लोकप्रियतेचा लाभ महापालिका निवडणुकीत उमेदवारांना होतो का, यावर लक्ष ठेवले जाणार आहे आणि या निमित्ताने पक्षश्रेष्ठींतर्फे आमदारांची लोकप्रियता तपासली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीत मोदी लाट उसळल्याने राज्यात भाजप सरकार बहुमताने सत्तेत स्थापन होऊ शकले, याची जाणीव पक्षाला असल्यामुळे मोदी लाटेचे लाभकारी कोण, अशांची वास्तविकतेत लोकप्रियता किती आहे, याची तपासणी महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने केली जाणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपच्या श्रेष्ठींनी महापालिकेच्या ‘मिशन हंड्रेड’साठी शहरातील आमदारांचा ट्वेंन्टी-२० सामना खेळविण्याचे ठरविले आहे. त्यासाठी प्रत्येक आमदाराला त्याच्या मतदारसंघातून २० उमेदवार निवडून आणण्याचे लक्ष्य दिले आहे. आमदारांना पक्षश्रेष्ठीने स्वातंत्र्य अधिकार दिले असले तरी त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे लक्ष राहणार आहे. यामुळे भाजपच्या आमदारांची आपसात स्पर्धा चालणार असल्याने प्रत्येकाची जबाबदारी वाढली आहे. पक्षाच्या परीक्षेत थेट लोकप्रियता पणाला लावली असल्यामुळे कमी नगरसेवक निवडून आल्यास पुढे उमेदवारी न मिळण्याची भीती आमदारांना आहे. त्यामुळे या मिशनमध्ये कुठला आमदार यशस्वी होतो, याकडे लक्ष लागले आहे.

महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याची जबाबदारी प्रत्येक पदाधिकाऱ्यांसोबत आमदारांवर आहे. शहराच्या विकासात सर्वच आमदारांनी आपापल्या प्रभागात केलेल्या विकास कामामुळे जनता भाजपवर विश्वास ठेवून मतदान करतील. त्यामुळे आमदारांची परीक्षा किंवा त्यांची लोकप्रियता तपासून पाहण्याचा प्रश्नच नाही.

– गिरीश व्यास, प्रदेश प्रवक्ता भाजप