महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत बनावट विद्यार्थी बसवणे व मूळ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका बदलवून उत्तीर्ण करवून देणाऱ्या रॅकेटचा भंडाफोड करण्यात जरीपटका पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून एका सेवानिवृत्त मुख्याध्यापकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे, यात मंडळाचे अधिकारी, कर्मचारी व मूल्यांकन करणाऱ्या शिक्षकांचा सहभाग असल्याचे दिसून येत आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सध्या दहावीची परीक्षा सुरू असून जरीपटका पोलिसांनी अतुल ऊर्फ गुड्ड शिवमोहन अवस्थी, चंद्रकांत ऊर्फ चंदू नीलकंठ मते आणि अमन मुकेश मोटघरे यांना अटक केली. एक अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेऊन त्याला त्याच्या कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले. हे आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत. या प्रकरणाचा तपास करताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीसह अनेक मोठी माणसे यात गुंतली असल्याचा संशय येत आहे. यात प्रामुख्याने किदवई शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक जुबेर रा. गिट्टीखदान आणि बजेरिया परिसरातील नितीन अंगरेज याचे नाव समोर येत आहे. जुबेर याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यासोबत अजून कोण जुळले आहे, याची चौकशी करण्यात येत आहे. आरोपींकडे पोलिसांना मोबाईल व व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकाच्या चिठ्ठय़ा व चार उत्तरपत्रिका सापडल्या. या उत्तरपत्रिका सोडवलेल्या असून त्या परीक्षा केंद्रांमध्ये बनावट परीक्षार्थीद्वारे बदलण्यात आल्या आहेत. मंडळातील अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात येणार आहे.

२२० वॅट्सच्या दिव्याने बारकोड काढायचे

आरोपी दोन प्रकारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचे काम करायचे. एका विषयाकरिता १० हजार रुपये आकारायचे.  पहिल्या पद्धतीत मूळ विद्यार्थ्यांचे परीक्षा प्रवेश पत्र घेऊन बनावट विद्यार्थ्यांचे छायाचित्र चिटकवायचे. दहावी किंवा बारावी उत्तीर्ण झालेले बनावट विद्यार्थी दुसऱ्या नावाने पाठवायचे. त्यांना प्रती पेपर २ हजार रुपये द्यायचे. दुसऱ्या पद्धतीमध्ये एखाद्याचा पेपर कोणत्या परीक्षकाकडे तपासण्यासाठी गेलेला आहे, याची इत्थंभूत माहिती त्यांच्याकडे असायची. ते परीक्षकाशी संपर्क साधून बनावट उत्तरपत्रिका खऱ्या उत्तरपत्रिकेसोबत बदलायचे. पण, खऱ्या उत्तरपत्रिकेवर बारकोड व होलोग्राम असतात. त्यामुळे ते बारकोड व होलोग्राम लागलेल्या कागदाच्या पाठीमागे २२० व्ॉटचा दिवा लावायचे. उष्णतेमुळे होलोग्राम व बारकोडचे गोंद निघायचे. त्यानंतर तो होलेग्राम व बारकोड बनावट व योग्य पद्धतीने सोडवलेल्या बनावट उत्तरपत्रिकेवर चिटकवून परीक्षकांकडून तपासून घ्यायचे. बनावट उत्तरपत्रिकेवरच विद्यार्थ्यांचा उत्तीर्ण असा निकाल लागायचा.

दोन वर्षांत ११ विद्यार्थ्यांना मदत

पोलिसांनी पकडलेल्या आरोपींनी आतापर्यंत दोन वर्षांत ११ विद्यार्थ्यांसाठी काम केल्याचे कबूल केले आहे. गेल्यावर्षी ६ आणि यंदा ५ विद्यार्थी होते, असे त्यांनी सांगितले. पण, जुबेर व नितीन हे मुख्य सूत्रधार असून त्यांच्याकडून अधिक विद्यार्थी व त्यांच्यासाठी काम करणारे मंडळाचे अधिकारी व परीक्षकांची नावे समोर येण्याची शक्यता आहे, अशी माहितीही पोद्दार यांनी दिली.