*   नागपूरकरांमध्ये उत्साह ,विधिवत प्रतिष्ठापना 

*   विकासकामांमुळे वाहतुकीस मात्र अडथळा

गुलाल-अबिराची अखंड उधळण.. ढोल-ताशांचा गगनभेदी निनाद.. अन् मंगलमूर्ती मोरयाच्या गजरात आज गुरुवारी गणरायाचे उत्साहात आगमन झाले. नागपूरकरांनी विधिवत लाडक्या श्रींची प्रतिष्ठापना केली. गणेशोत्सव मंडळांनी वाद्यांच्या गजरात काढलेल्या मिरवणुका व फुललेल्या बाजारपेठांमुळे संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण होते. सेंट्रल अ‍ॅव्हेन्यू येथे गणपतीच्या मूर्ती नेण्यासाठी वाहनांची आणि गणेशभक्तांच्या गर्दीमुळे या भागातील वाहतूक खोळंबली होती. काही स्वयंसेवी संस्थांसह पोलिसांनी तेथील वाहतूक व्यवस्था सांभाळत चितारओळीतून मूर्ती काढण्यासाठी मंडळाना सहकार्य केले.

लाडक्या गणरायाची मूर्ती खरेदी केल्यानंतर ‘मंगलमूर्ती मोरया’ असा जयघोष करीत कोणी कारमध्ये, कोणी दुचाकी वाहनावर तर कोणी मोठय़ा वाहनांमध्ये  मूर्ती घेऊन जात होते.

यावेळी  गणपतीच्या मूर्तीवर गुलाबवृष्टी केली जात होती. चितारओळ परिसरात लोकांची गर्दी बघता सकाळपासून बडकस चौकातून गांधी पुतळाकडे आणि चितारओळीकडे जाणारे मार्ग बंद करण्यात आले होते. सेंट्रल अ‍ॅव्हेन्यू येथे मेट्रोचे काम सुरू आहे. रस्त्याच्या आजूबाजूला दुकाने थाटण्यात आली आहेत. शिवाय गणपतीच्या मूर्ती नेण्यासाठी मोठय़ा वाहनांच्या रांगा होत्या. त्यामुळे दुपारनंतर या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.

दोन दिवसापूर्वी आगमन झालेल्या रेशीमबागेतील नागपूरचा राजा, संती गणेश मंडळ आणि पाताळेश्वर मंदिराजवळील महालचा राजाची प्रतिष्ठापना आज सकाळी करण्यात आली. भोसलेकालीन गांडल्याचा गणपती आणि महालातील भोसले वाडय़ातील गणपतीची मूर्ती पालखीतून नेण्यात आली.  विविध सार्वजानिक मंडळात सजावट व देखाव्यांवर अंतिम हात फिरवला जात होता.

राजकीय नेत्यांच्या निवासस्थानी गणेशोत्सव

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या रामनगरातील भक्ती निवासस्थानी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी त्यांच्या कुटुंबाताली सदस्यांसह मित्र परिवारातील सदस्य उपस्थित होते. यावेळी गडकरी यांनी  गणेशोत्सवाच्या निमित्ताने जनतेला शुभेच्छा दिल्या. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी खासदार विलास मुत्तेमवार, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, राजेंद्र मुळक यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाची  प्रतिष्ठापना करण्यात आली.

फेटा, पगडीतील मूर्तीना अधिक मागणी

बाजारामध्ये गणपतीच्या विविध रूपांमध्ये आकर्षक मूर्ती विक्रीला आल्या आहेत. यावेळी फेटा आणि पगडीमध्ये सिंहासनावर आरूढ  गणपतीच्या मूर्तीना अधिक मागणी असल्याचे दिसून आले. अमरावती, भंडारा या ठिकाणाहून मोठय़ा प्रमाणात गणपतीच्या मूर्ती आल्या आहेत. शहरातील विविध भागातील सार्वजानिक गणेश मंडळांच्या गणपतीच्या मूर्ती चितारओळीत तयार केल्या जात असल्यामुळे  मंगळवार आणि बुधवारची संपूर्ण रात्र ढोल ताशांच्या गजरात चितारओळ जागी होती.