नागपूर : शहरातील थकित मालमत्ता करधारकांना १ एप्रिलपासून ३० जून या काळात १० टक्के सवलत देण्यात आली आहे. ज्यांनी १ एप्रिलनंतर ऑनलाईन मालमत्ता कर भरला आणि त्यांना सवलत देण्यात आली नाही, अशा करधारकांना आता १० टक्के पैसे परत केले जातील किंवा पुढील देयकामध्ये ते कमी करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर दिली.

शहरात थकित मालमत्ता कर भरण्यासाठी ३० जूनपर्यंत देयकांमध्ये १० टक्के सवलत जाहीर केल्यानंतर त्याला प्रतिसाद चांगला मिळाला आहे. २८ मे रोजी ही योजना जाहीर केली असली तरी १ एप्रिलपासून अंमबजावणी होणार आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी ऑनलाईन किंवा महापालिकेच्या झोन कार्यालयात १ एप्रिलनंतर थकित कर भरला आहे त्यांचे पैसे परत केले जाणार आहेत. ज्यांना सवलत देण्यात आली नाही अशा काही नागरिकांचे पैसे परत करण्यात आल्याचे भोयर यांनी सांगितले. २९ हजार लोकांना याचा फायदा होणार आहे.

मोबाईल सीमसाठी ५० लाख

महापालिकेचे अधिकारी, पदाधिकारी व आवश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामाच्या दृष्टीने संपर्क साधण्यासाठी महापालिकेकडून मोबाईल सीम कार्ड पुरवण्यात आले आहेत. यासाठी निविदा मागवण्यात आली असून ५० लाख रुपये त्यासाठी मंजूर करण्यात आले आहेत. महापालिकेची आर्थिक स्थिती आधीच कमकुवत असताना आता स्थायी समितीने अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या मोबाईल सीमसाठी ५० लाख रुपये मंजूर केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.