महापालिका निवडणुकीत पक्षाची ताकद वाढण्यासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षातील बंडखोर उमदेवाराच्या प्रचारात सहभागी दोन नगरसेविका आणि दोन माजी नगरसेवकांना पक्षात परत घेतले आहे.

नगरसेविका मंगला गवरे आणि शीतल घरत यांना पक्षविरोधी कारवाई केल्याने पक्षातून निलंबित करण्यात आले होते. त्यांच्यासह दोन माजी नगरसेवक प्रवीण सांदेकर आणि गणेश डोईफोडे यांनी उद्धव ठाकरे यांची शनिवारी मुंबईत भेट घेतली. ठाकरे यांनी गवरे, घरत, सांदेकर आणि गणेश डोईफोडे यांना शिवबंधन बांधले. त्यानंतर त्यांचा पक्षात पुनप्र्रवेश झाल्याचे जाहीर करण्यात आले.

दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख शेखर सावरबांधे यांनी पदाचा राजीनामा देऊन अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. सावरबांधे यांच्या प्रचाराची धुरा या चौघांनी सांभाळली होती. त्यामुळे पक्षाचे तत्कालीन संपर्क प्रमुख डॉ. दीपक सावंत यांनी या चौघांच्या निलंबनाची शिफारस केली होती. पक्षाने त्यांना निलंबित केले होते. परंतु सावरबांधे आणि या चौघे कोणत्याही पक्षात केले नाही. आम्ही शिवसैनिक असल्याचे सांगत राहिले. महापालिका निवडणुका पुढील वर्षी होत आहे. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने ही निवडणूक होत आहे. भाजपला एकहाती सत्ता प्राप्त करायची असल्याने शिवसेनेशी युती करण्यास अजिबात इच्छुक नाहीत. त्यामुळे शिवसेनेला स्वबळावर निवडणूक लढावावी लागणार आहे. यासाठी सक्षम उमेदवारांचा शोध सुरू केला असून पक्षातून निलंबित नगरसेवकांना परत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

निलंबित सावरबांधे यांचे काय?

पक्षाची ताकद वाढवण्यासाठी निलंबित आजी-माजी नगरसेवकांना पुनप्र्रवेश देण्यात आल्याने माजी जिल्हाध्यक्ष तसेच माजी उपमहापौर शेखर सावरबांधे यांचा शिवसेनेत पुनर्प्रवेश होणार काय, याकडे लक्ष लागले आहे. सावरबांधे यांच्या गटातील चौघांचा पक्षात प्रवेश झाला आहे. बंडखोरी केल्यामुळे त्यांना देखील पक्षातून निलंबित करण्यात आले. निलंबित जिल्हाध्यक्षांच्या प्रचारात सहभागी नगरसेवकांना पक्षात सहभाग झाल्याने शहराच्या राजकारणाची जाण असलेल्या सावरबांधे यांचे निलंबन मागे घेण्याची शक्यता बळावली आहे.