तीन महिन्यांत परीक्षेबाबत अहवाल अपेक्षित

नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) पूर्व परीक्षेतील ‘सी-सॅट’चा पेपर केवळ पात्र करावा, अशी मागणी स्पर्धा परीक्षार्थींची आहे. आयोगही यासाठी सकारात्मक आहे. मात्र, आयोगाला यासंदर्भात परस्पर निर्णय घेण्यास मर्यादा असल्याने तज्ज्ञ सदस्यांची समिती नेमून ‘सी-सॅट’ पेपरवर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. बुधवारी झालेल्या आयोगाच्या अंतर्गत बैठकीमध्ये यावर चर्चा करण्यात आली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि राज्य सरकारमध्ये बुधवारी आयोजिलेली बैठक फिस्कटली. त्यामुळे एमपीएससीच्या विविध रखडलेल्या परीक्षांवर कुठलाही निर्णय होऊ शकलेला नाही. मात्र, आयोगाच्या अंतर्गत बैठकीमध्ये ‘सी-सॅट’वर चर्चा करण्यात आली.

आयोगाने यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी वेळूकर समितीची स्थापना केली होती. मात्र, समितीने ‘सी-सॅट’ उत्तीर्ण करणे अनिवार्य असल्याचा निर्णय दिला होता. समितीच्या या निर्णयानंतरही परीक्षार्थींचे समाधान न झाल्याने ‘सी-सॅट’संदर्भात वारंवार निवेदन देण्यात आले. ‘सी-सॅट’चा पेपर पात्र करण्यासंदर्भात आयोगही सकारात्मक आहे. मात्र, आयोग यासंदर्भात परस्पर निर्णय घेऊ शकत नसल्याने समितीच्या अहवालावरूनच ‘सी-सॅट’चा निर्णय होणार आहे.

परीक्षेविषयी…

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेत देखील ‘सी-सॅट’ पेपर द्यावा लागतो. त्याच धर्तीवर ‘एमपीएससी’ने देखील ‘सी-सॅट’ पेपर सुरू केला. मात्र, ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांना ‘सी-सॅट’चा पेपर उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून हा पेपर केवळ पात्र करावा, अशी मागणी वारंवार केली जात आहे.

 

तज्ज्ञांचा शोध…

‘सी-सॅट’ पेपरच्या तज्ज्ञ समितीसाठी सदस्यांचा शोध सुरू असून माजी कुलगुरू किंवा शिक्षणतज्ज्ञांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली जाणार आहे. ही समिती सर्व बाजूंनी अभ्यास करून तीन महिन्यांच्या आत आपला अहवाल सादर करेल. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षेतील ‘सी-सॅट’ पेपरचा निर्णय हा या समितीच्या अहवालावर अवलंबून असेल.