पूर्व विदर्भातील युतीचा पहिला मनोमिलन सोहळा उत्साहात

महाराष्ट्रात साडेचार वर्षे भाजपवर टीका करण्याची एकही संधी न सोडणारी शिवसेना आणि त्या टीकेला सक्षम उत्तर न देता मवाळ भूमिका घेणारी भाजप यांच्यात निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या युतीनंतर आज शुक्रवारी नागपुरात दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मनोमिलन सोहोळा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या जोशपूर्ण भाषणातून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तर सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयतपणे युती का केली हे समजावून सांगितले.

युती होणार की नाही, अशा अवस्थेत युती करून प्रचारात आघाडी घेणाऱ्या भाजप-सेनेचे आज विदर्भात संयुक्त संकल्प मेळावे झाले. पूर्व विदर्भासाठी येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मात्र, दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते संयुक्तपणे घोषणा देण्याऐवजी आपल्याच नेत्यांच्या भाषणाला प्रतिसाद देत होते. सेनेचा नेता भाषणाला उठला की सैनिकांचा आवाज वाढायचा आणि भाजप नेत्यासाठी त्यांचे कार्यकर्ते घोषणा देत असल्याचे चित्र सभागृहात होते. अमरावतीचा मेळावा आटोपून दोन्ही पक्षांचे नेते नागपुरात आले. तोपर्यंत तेथील भाषणे समाज माध्यमांवर व्हायरल झाली होती. त्यामुळे नवीन काय बोलायचे असा प्रश्न होता. ही बाब फडणवीस आणि उद्धव यांनी त्यांच्या भाषणात सुरुवातीलाच स्वीकारली. त्यामुळे ते नवीन काही बोलतील याबाबत उत्सुकता होती. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या आक्रमक भाषणातून कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्याचा प्रयत्न केला. केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती देतानाच त्यांनी विरोधकांवरही सडकून टीका केली. निवडणुकीच्या काळात मैदानात उतरण्याऐवजी विरोधी पक्षातील नेते बारावा खेळाडू होण्याचाच प्रयत्न करीत आहेत. सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्यांचे प्रतिनिधी यापुढे लढावू विमानात न्यावे लागतील, असे ते म्हणाले.  याउलट उद्धव यांनी अतिशय संयमी शब्दात युती का केली, याबाबतची भूमिका मांडली.  त्यांनी कार्यकर्त्यांना तुम्हाला हे पटले का, अशी विचारणा केली. मात्र  समोरून आलेल्या प्रतिसादात उत्स्फूर्तता नव्हती.  त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा विचारणा केली. मात्र तरीही आवाज न वाढल्याने  उद्धव यांनी हा मुद्दाच बाजूला ठेवला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही सरकारशी संघर्ष करीत होतो, व्यक्तिगत मागणी नव्हती, आम्ही केलेल्या मागण्यांची पूर्तता  सरकारने केली. कार्यकर्त्यांनी उमेदवार कोण  यापेक्षा प्पक्षाचे चिन्ह डोळ्यापुढे ठेवून प्रचार करावा, असे आवाहन त्यांनी केले. गडकरी यांनी देशभर सुरू केलेल्या कामांची माहिती दिली.

यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार सुधाकर देशमुख, आमदार नाना श्यामकुळे, प्रकाश जाधव, यांची भाषणे झाली. भाजपचे शहर अध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी केले. कार्यक्रमानंतर मुंबईतील पादचारी पूल दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.  कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वर्धेचे खासदार रामदास तडस,  गडचिरोलीचे खासदार अशोक नेते, रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, माजी मंत्री दीपक सावंत, माजी खासदार दत्ता मेघे यांच्यासह दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते.

जोशीसरांनी घेतला कार्यकर्त्यांचा वर्ग

शिवसेना नेते व लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी हे एका व्याख्यानासाठी आज नागपुरात आले होते. नागपुरात मेळावा असल्याचे त्यांना कळल्यावर ते स्वत:हून कार्यक्रमस्थळी आले. युतीचे आपण क्रट्टर पुरस्कर्ते आहोत, हिंदुत्वासाठी युती होणे आवश्यक होते. ती झाल्याने आपल्याला आनंद आहे, असे सांगतानाच त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणुका कशा जिंकायच्या, याबाबत उद्बोधन केले. नेत्यांनी हवा तयार करायची आणि कार्यकर्त्यांनी घराघरापर्यंत जाऊन केलेल्या कामांची माहिती द्यायची, कामचुकारपणा करायचा नाही आणि आपसातील कुरबुरी बाजूला ठेवायच्या असे ते म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आपले संबंध आहेत, असेही ते म्हणाले.

क्रिकेट, इम्रान आणि पवार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करण्याची एकही संधी व्यासपीठावरील नेत्यांनी सोडली नाही. उद्धवही त्यात मागे नव्हते. पवार यांच्या नावाचा उल्लेख न करता त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे उदाहरण दिले.  इम्रान खान हे क्रिकेटपटू होते. राजकारणात आल्यावर ते पंतप्रधान झाले. भारतात पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहणारे नेते मात्र क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष झाले. याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यांच्या या वाक्याला शिवसैनिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

भाजप आमदाराचे ‘जयविदर्भ’

शिवसेनेचे पक्षप्रमुख व्यासपीठावर बसलेले असतानाच त्यांच्या आसनामागे बसलेले भाजपचे रामटेकचे आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांनी ‘जय विदर्भ’ ची घोषणा दिली. नेत्यांच्या भाषणात त्यांचा आवाज दबून गेला असला तरी स्वतंत्र विदर्भाची मागणी युतीच्या व्यासपीठावरून होणे याची चर्चा मेळाव्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती.

मतभेद व्यक्त करण्याची पद्धत बदलू

मागच्या साडेचार वर्षांत युतीत अनेक मतभेद झाले. त्या मतभेदांची जाहीर वाच्यताही झाली. परंतु अशा वाच्यतेमुळे युतीच्या मूळ उद्देशावरच शंका उपस्थित होण्याची शक्यता असते. त्यामुळे यापुढे मतभेद व्यक्त करण्याची पद्धत बदलू, असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

‘सस्पेन्स थ्रीलर’ नाटक

देशपांडे सभागृहाबाहेर एका ‘सस्पेन्स थ्रीलर’ नाटकाचा फलक लागला आहे. त्याचा उल्लेख करताना उद्धव म्हणाले की, मी सभागृहात आलो तेव्हा हा फलक दिसला. सभागृहात आल्यावर कळले की  या नाटकातील कलावंत आम्हीच आहोत. त्यामुळे युती का केली, हे तुम्हाला कळलेच असेल.