दोघेही सेवानिवृत्त पोलिसांची मुले

नागपूर : इंदोरा मैदानात मद्यपींवर कारवाई करण्याचा धाक दाखवून त्यांच्याकडून खंडणी मागणाऱ्या दोन तोतया पोलिसांना पकडून नागरिकांनी चोप दिला. त्यानंतर त्यांना जरीपटका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. खंडणीबहाद्दर दोन्ही आरोपी सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षकांची मुले असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

आशीष कृष्णराव देशमुख (३२) रा. राऊ त लेआऊ ट,जाफरनगर व केतन ताराचंद ढोबळे (२५)  रा. जाफरनगर अशी आरोपींची नावे आहेत.  दोघेही बेरोजगार आहेत. रविवारी रात्री सौरभ गौतम गायकवाड (२२) रा. लष्करीबाग व त्याचा मित्र लोकेश मेश्राम  हे दोघे इंदोरा मैदान परिसरात कच्चा चिवडा खात होते. त्यावेळी आशिष व केतन दुचाकीने तेथे आले. ‘आम्ही पोलीस आहोत, तुम्ही दारु पित आहात, तुम्हाला अटक करू’, अशी धमकी दोघांनी सौरभ व लोकशला दिली. त्यानंतर दोघांनी सौरभ याच्याकडील मोबाईल हिसकावला. लोकशने त्यांना १०० रुपये दिले.

दोघांनी सौरभला मोबाइल परत केला. अटक करण्याची धमकी दिली.  त्यानंतर आशीष व केतन बाजूला असलेल्या चिकन सेंटरवर गेले. दारू पिऊ  नका, पोलीस आले आहेत, असे लोकशने चिकन सेंटरच्या मालकाला सांगितले. चिकन सेंटरचा मालक व नागरिकांना दोघांना ओळखपत्राबाबत विचारणा केली. दोघांनी ओळखपत्र दाखवले नाही. दोघेही तोतया पोलीस असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नागरिकांनी त्यांना चोप दिला. घटनेची माहिती जरीपटका पोलिसांना दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पराग पोटे यांच्या मार्गदर्शनात जरीपटका पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांना २४ तासांच्या आत सोमवारी न्यायालयात हजर केले. तोतयागिरी प्रकरणात न्यायालयात अत्यंत कमी कालावधीत दोषारोपत्र सादर करण्याची ही शहर पोलिस दलातील अलिकडच्या काळातील पहिलीच घटना होय.