* मेंदूमृत रुग्णाच्या अवयवातून चार रुग्णांना जीवदान * यकृताचे औरंगाबादच्या रुग्णात प्रत्यारोपण

वर्धा जिल्ह्य़ातील एका मेंदूमृत शेतकऱ्याच्या अवयवदानाने अनेक कुटुंबात प्रकाश परतला आहे. या रुग्णाच्या हृदयाचे चेन्नईतील रुग्णात, यकृताचे औरंगाबादच्या रुग्णात, तर मूत्रपिंडाचे वोक्हार्ट आणि ऑरेंज सिटी रुग्णालयातील रुग्णात प्रत्यारोपण करण्यात आले आहे. या रुग्णाचे हृदय आणि यकृत विमानाने चेन्नई आणि औरंगाबादला हलवण्यासाठी नागपूर पोलिसांनी ग्रिन कॅरिडोर उपलब्ध करून दिला होता. याप्रसंगी या मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली  होती.

जनार्दन रामाजी बोबडे असे दिलदार मेंदूमृत रुग्णाचे नाव आहे. ते वर्धा जिल्’ातल्या हिंगणघाट तालुक्यातील किन्हाळा येथील रहिवासी. पिढीजात शेतीवर गुजराण करणाऱ्या जनार्दन यांचा हिंगणघाटवरून परतत असताना १४ फेब्रुवारीला अपघात झाला. रस्त्यात रानडुक्कर आडवे आल्याने त्यांच्या दुचाकीला अपघात झाल्याने ते खाली कोसळले. यात त्यांच्या मेंदूला जबर दुखापत झाली. त्यांना सुरुवातीला हिंगणघाट रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्यांना सेवाग्राम मेडिकल कॉलेजला हलवण्यात आले. मात्र, प्रकृती पाहता तेथील डॉक्टरांनी नागपूरला हलवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर नातेवाईकांनी नागपूरचे न्यूरॉन हॉस्पिटल गाठले. दरम्यान, त्यांच्या मेंदू पेशी मृत पावत असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. शुक्रवारी अखेर त्यांच्या मेंदूपेशी मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तेथून सुरू  झाले अवयवदानाची प्रक्रिया. हिंगणघाट येथील कृषी सेवा केंद्राचे संचालक विजय सिंह मोहता, विभागीय अवयवदान प्रत्यारोपण समितीच्या वीणा वाटोरे यांनी मध्यस्थी करून रुग्णाच्या नातेवाईकांच्या मनाची तयारी केली. अखेर नातेवाईकांनीही या माणुसकीच्या नात्याला होकार दिला. सकाळी तडकाफडकी सूत्रे हलवत राष्ट्रीय अवयवदान प्रत्यारोपण समितीला माहिती देण्यात आली.

त्यानुसार चेन्नई येथे एक रुग्ण हृदय आणि औरंगाबाद येथे एक रुग्ण यकृताच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती मिळाली. तेथील डॉक्टरांशी संपर्क साधून जनार्दन बोबडे यांचे अवयव तेथील डॉक्टरांची चमू नागपूरला आल्यावर त्यांच्या सुपूर्द करण्यात आले.

नेत्रदानाने दोघांच्या आयुष्यात प्रकाश

चेन्नईच्या फोर्टिस रुग्णालयाचे हृदय प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. मोहन आणि डॉ. जगदीश यांच्यासह चार जणांची टीम शनिवारी सकाळी वोक्हार्ट रुग्णालयात दाखल झाली. त्याच वेळी औरंगाबादच्या एमजीएम रुग्णालयाचे यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. हुनेद, डॉ. प्रशंथा राव यांच्या नेतृत्वाखाली दुसरी टीमही वोक्हार्टला पोहचली. दोन्ही टीम दुपारी दोनच्या सुमारास हृदय आणि तीनच्या सुमारास यकृत घेऊन चेन्नई आणि औरंगाबादच्या दिशेने विमानाने पोहचले. मेंदूमृत रुग्ण बोबडे यांचे नेत्र महात्मे नेत्रपेढीकडे सुपूर्द करण्यात आले असून त्याच्या प्रत्यारोपणातून दोघांच्या आयुष्यात प्रकाश पेरणी  होणार  आहे.