News Flash

नागपूर सामूहिक हत्याकांड : उपकाराची अशीही परतफेड

मुख्यमंत्र्यांच्या शहरातच पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पैशाच्या वादातून एकाने केली पोटच्या मुलासह पाच जणांची हत्या

पैशाच्या वादातून एकाने स्वतच्या मुलासह बहीण, मेव्हणा, सासू, भाची अशा पाच जणांची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना नागपूरमध्ये सोमवारी उघडकीस आली. केली. दिघोरी, आराधनानगर परिसरात ही घटना घडली. या घटनेने उपराजधानीत एकच खळबळ उडाली असून मुख्यमंत्र्यांच्या शहरातच पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कमलाकर मोतीराम पवनकर (५३), अर्चना कमलाकर पवनकर (४५), वेदांती कमलाकर पवनकर (१२), मीराबाई मोतीराम पवनकर (७५) आणि कृष्णा विवेक पालटकर (५) सर्व रा. प्लॉट क्रमांक ५, आराधनानगर, खरबी रोड अशी मृतांची नावे आहेत. विवेक गुलाब पालटकर (४०) रा. नवरगाव, ता. मौदा असे आरोपीचे नाव असून तो फरार आहे. या हत्याकांडावेळी दुसऱ्या खोलीत झोपलेल्या दोन मुली बचावल्या आहेत. यात मृत कमलाकर यांची मुलगी मिताली (७) व आरोपीची मुलगी वैष्णवी (७) यांचा समावेश आहे.

कमलाकर पवनकर हे मूळचे भंडारा जिल्ह्य़ातील पवनी तालुक्यातील जांभोरा-पालोरा गावचे रहिवासी आहेत. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ते भूखंड विक्रीच्या व्यवसायात दलालीचे काम करीत होते. काही वर्षांपूर्वी त्यांनी खरबी मार्गावर आराधनानगर येथे घर बांधले. त्या ठिकाणी पत्नी, दोन मुली व आईसह राहात होते. घराच्या ठिकाणीच त्यांचे इलेक्ट्रॉनिक्स साहित्याचे दुकानही आहे.रविवारी रात्री विवेक बहिणीकडेच मुक्कामी होता. रात्री १ ते ३ वाजताच्या सुमारास त्याने झोपलेल्या सर्वाची लोखंडी हत्याराने डोके ठेचून हत्या केली. कमलाकर यांच्या आई उठून स्वयंपाकघरात गेली होती, त्यांनाही विवेकने ठार केले व त्यानंतर तो पळून गेला. विशेष म्हणजे आजीसह दुसऱ्या खोलीत झोपल्यामुळे दोन मुली बचावल्या.

उपकाराची अशीही परतफेड

आरोपी विवेक हा नवरगावला राहायचा. मे २०१५ मध्ये त्याने पत्नीची हत्या केली होती. त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. तेव्हापासून त्याची मुलेही कमलाकर यांच्याकडे राहात होती. शिक्षेला विवेकचे मेव्हणे कमलाकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने आरोपीची निर्दोष सुटका केली होती. एप्रिल २०१७ मध्ये तो कारागृहाबाहेर आला. तेव्हापासून तो नागपुरातच राहातो. दरम्यान, त्याच्या न्यायालयीन लढय़ासाठी बहीण व मेव्हण्याने लाखो रुपये खर्च केले होते. हे पैसे ते परत मागत होते आणि गावाकडील शेतजमीन विकण्यास सांगत होते. मात्र, विवेक यासाठी तयार नव्हता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 2:29 am

Web Title: family murder crime in nagpur
Next Stories
1 नागपूर हत्याकांड; अशा बचावल्या दोन मुली
2 कॅबमधील ‘जीपीएस’मुळे अपघाताला आमंत्रण!
3 भंडारा-गोंदियातील भाजपच्या पराभवाचे खापर फुकेंवर
Just Now!
X