अपात्र लाभार्थ्यांचीच संख्या अधिक : संथ अंमलबजावणीमुळे नाममात्र शेतकऱ्यांना लाभ
शेतकऱ्यांना सावकारी कर्जापासून मुक्त करण्यासाठी गतवर्षी युती शासनाने सावकारी कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, अंमलबजावणीच्या संथगतीमुळे अद्यापही अनेक शेतकऱ्यांना त्याला लाभ मिळालेला नाही. विशेष म्हणजे, या योजनेत पात्र लाभार्थ्यांपेक्षा अपात्र लाभार्थ्यांचीच संख्या अधिक आहे.
जिल्ह्य़ातील ३४९ सावकारांच्या दस्तावेजानुसार सावकारांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ८४०२० आहे. तलाठी आणि महसूल यंत्रणेकडून ६१९७८ शेतकऱ्यांच्या याद्या प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी ६६६७ शेतकरी पात्र, तर १६,८१५ अपात्र ठरले आहेत. ९३७५ शेतकरी कार्यक्षेत्राबाहेरील असल्याने तसेच ४०३७४ शेतकऱ्यांनी कर्जफेड केल्याने त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. ६१६५ कर्जदार इतर कारणांसाठी अपात्र ठरले आहेत.
महाराष्ट्र शासनाने विदर्भ व मराठवाडय़ातील शेतक ऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली होती. त्यानुसार २०१४-१५ या आर्थिक वर्षांत ज्या शेतकऱ्यांनी सावकाराकडून कर्ज घेतले होते त्यांचे कर्ज माफ होणार होते. यासाठी सुरुवातीला ६ कोटी रुपये नागपूर जिल्ह्य़ासाठी देण्यात आले. त्यानंतर पुन्हा ५ कोटी रुपयांची मागणी नोंदविण्यात आली. त्यानुसार परवानाधारक सावकारांकडून ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले व परतफेड केली नव्हती, अशा थकबाकीदारांची माहिती तालुका सहाय्यक निबंधकांकडून घेण्यात आली. जिल्ह्य़ातील १३ तालुक्यातील ३४९ परवानाधारक सावकारांच्या भांडवल पुस्तिकेचा आधार घेऊन याद्या तयार करण्यात आल्या. याद्यांच्या तपासणीसाठी ३३ लेखा परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली.
आतापर्यंत कर्जमाफीसाठी ९ जिल्हास्तरीय समित्यांच्या सभा घेण्यात आल्या. जिल्हास्तरीय सभेत एकूण ६२६७ शेतकऱ्यांना कर्जमाफी मंजूर करण्यात आली. एकूण प्राप्त ६ कोटींपैकी १३८ सावकारांच्या खात्यात ३.९३ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. या योजनेस शासनाने आता डिसेंबर २०१६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
अतिशय गाजावाजा करून सरकारने या योजनेची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर पहिले सहा महिने योजनेचे निकष ठरविण्यातच गेले. एकदा निकष निश्चित केल्यानंतर सावकारांनी त्याला न्यायालयात आव्हान दिले. त्यात काही महिने गेल्यावर अंमलबजावणी सुरू झाली.
मात्र, मोठय़ा प्रमाणात कर्जदार शेतकरी अपात्र ठरले. त्यामुळे या योजनेचा बहुतांश कर्जदार शेतकऱ्यांना लाभच मिळू शकलेला नाही. अजूनही लेखापरीक्षकांकडून याद्या तपासणीचे काम पूर्ण व्हायचेच आहे. पालक सचिव प्रवीण दराडे यांनी ३० जानेवारीला यासंदर्भात नागपुरात बैठक घेऊन योजनेचा आढावा घेतला होता. या योजनेत तालुका हा निकष असल्याने अनेक कर्जदार बाद ठरले आहेत.

सावकार कर्जमाफी
* परवानाधारक सावकार ९६६
* यादी देणारे सावकार ३४९
* कर्जदारांची संख्या ८४०२०
* पात्र शेतकरी ६६६७
* अपात्र शेतकरी १६८१५