यवतमाळमधील घटना ताजी असतानाच अकोला जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीमुळे एक बळी गेला. गोविंद मनिरामजी अस्वार असे या शेतकऱ्याचे नाव असून कीटकनाशक फवारणीत शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची अकोला जिल्ह्यातील ही दुसरी घटना आहे.

यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीदरम्यान विषबाधा झाल्याने २० हून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटत असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. तर दुसरीकडे अकोल्यात मंगळवारी एका अल्पभूधारक शेतकऱ्याचा मृत्यू झाला. गोविंद मनिराम अस्वार (४६) यांनी ६ डिसेंबर रोजी शेतात कीटकनाशकाची फवारणी केली होती. ७ डिसेंबर रोजी त्यांना विषबाधा झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती खालावल्याने त्यांवा दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले. पाच दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.