दुधाला अधिक भाव मिळावा, या मागणीसाठी जय जवान जय किसान संघटनेच्यावतीने सोमवारी भंडारा मार्गावर प्रजापती चौकात करण्यात आलेल्या ‘ दूध फेको’ आंदोलनादरम्यान संघटनेचे उपाध्यक्ष शरद खेडीकर यांचे हृदयविकाराने निधन झाले.

विविध मागण्यांसाठी शेतक ऱ्यांच्या संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. नागपुरातही ‘जय जवान जय किसान’ संघटनेच्यावतीने प्रशांत पवार यांच्या नेतृत्वाखाली ‘दूध फेको’ आंदोलन आज करण्यात आले. आंदोलनात शरद खेडीकर सक्रिय होते. खेडीकर ध्वनिक्षेपकावरून सरकारच्या विरोधात घोषणा देत होते. यावेळी त्यांच्या छातीत दुखू लागले. अस्वस्थ वाटत असल्याने कार्यकर्त्यांनी त्यांना शेजारी असलेल्या नगरसेवक दुनेश्वर पेठे यांच्या जनसंपर्क कार्यालयात जाऊन बसण्यास सांगितले. मात्र, त्याही ठिकाणी अस्वस्थता कमी होत नव्हती. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात नेण्याचे ठरले. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

शरद खेडीकर अर्जनवीस होते व अनेक वर्षांपासून जय जवान जय किसान संघटनेत काम  करीत होते. संघटनेने केलेल्या प्रत्येक शेतकरी आंदोलनात ते सहभागी होत असत. मेट्रो रिजन आराखडय़ासाठी केलेल्या आंदोलनात त्यांचा सहभाग होता. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.