19 March 2019

News Flash

लोकजागर : वैदर्भीयांकडूनही ‘दादाजी’ उपेक्षितच!

उपेक्षेचे धनी ठरलेले दादाजी खोब्रागडे जाऊन आता आठवडय़ापेक्षा जास्त काळ लोटला आहे.

दादाजी खोब्रागडे 

उपेक्षेचे धनी ठरलेले दादाजी खोब्रागडे जाऊन आता आठवडय़ापेक्षा जास्त काळ लोटला आहे. या संशोधकाच्या मृत्यूमुळे निर्माण झालेली हळहळ अजून थांबायला तयार नाही. त्यांच्यावर राज्य सरकारने अन्याय केला, कृषी विद्यापीठांनी पाठ फिरवली, यावर अजूनही चर्चा सुरू आहे. मात्र, वैदर्भीय नेत्यांनी सुद्धा दादाजीवर अन्याय केला यावर फारसे कुणी बोलायला तयार नाही. हे सर्व आठवण्याचे कारण त्यांच्या मृत्यूपश्चात सुरू झालेल्या राजकारणात दडले आहे. या धानसंशोधकाच्या कुटुंंबाचे सांत्वन करण्यासाठी राहुल गांधी येण्याचे निश्चित झाले व या राजकारणाला सुरुवात झाली. काँग्रेसचे अध्यक्ष येणार, असे कळताच केंद्रात मंत्री असलेले हंसराज अहीर अगदी घाईघाईने रात्रीच्या अंधारात दादाजीच्या गावाला जाऊन आले. अहीर गृहराज्यमंत्री असले तरी आठवडय़ातील बराच काळ ते विदर्भात व त्यातल्या त्यात त्यांच्या लोकसभा मतदारसंघात फिरत असतात. मतदारांच्या सतत संपर्कात राहणे हा त्यांच्या आवडीचा छंद आहे. त्यावर कुणाला आक्षेप असण्याचे काही कारण नाही. या छंदामुळे ते मंत्रीपदाला कितपत न्याय देतात, हे बघणे मोदींचे काम आहे. त्यामुळे त्यात इतरांनी लक्ष देण्याचे काही कारण नाही. दादाजीच्या निधनाची बातमी सर्वच माध्यमांनी अगदी ठळकपणे दिली. त्यांची कामगिरीही सांगितली. तरीही त्यांचे अंत्यदर्शन वा अंतिम संस्काराला जावे असे अहिरांना वाटले नाही. दादाजींचे नांदेड हे गाव चिमूर विधानसभा मतदारसंघात येते. बंटी भांगडिया या भागाचे आमदार आहेत. तेही गेले नाही. शेती, संशोधन हे विषय कदाचित त्यांच्या प्राधान्यक्रमावर नसतील. अहीर व भांगडिया हे दोघेही भाजपचे. पदावर असलेल्या या नेत्यांना तेव्हा दादाजींच्या पार्थिव दर्शनासाठी जावेसे न वाटणे व आता राहुल गांधी येत आहेत, असे समजताच धाव घ्यावीशी वाटणे हेच राजकारण आहे. दादाजींच्या अंत्यसंस्काराला भाजपचे माजी आमदार देशकर, चटप, भेंडारकर अशी मंडळी हजर होती. आता राहुल गांधींचा दौरा आयोजित करणारे काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार सुद्धा गेले नव्हते. या निधनाचे निमित्त साधून राहुल गांधींना विदर्भात आणण्याची कल्पना याच वडेट्टीवारांची! हा संधीसाधूपणाचाच प्रकार, पण राजकारणात त्यालाच महत्त्व आहे. त्यामुळे भाजप व काँग्रेसच्या नेत्यांना दोष देता येणार नाही. प्रश्न आहे तो दादाजी जिवंत असताना या वैदर्भीय नेत्यांनी काय केले? राहुल गांधींची भेट निष्प्रभ ठरावी म्हणून दादाजींच्या स्मारकाची घोषणा करण्याची मजल गाठणारे अहीर गेली अनेक वर्षे राजकारणात सक्रिय आहेत. गेली चार वर्षे सत्तेत आहेत. त्यांनी कधी दादाजीला न्याय मिळावा म्हणून प्रयत्न केले का? दादाजीच्या संशोधनाची दखल घ्या, अशी पत्रे सरकार व विद्यापीठांना लिहिणे वेगळे व दादाजीला सोबत घेत त्यांच्या सन्मानासाठी झटणे वेगळे. वैदर्भीय नेतृत्व नेमके येथे कमी पडते. हेच दादाजी पश्चिम महाराष्ट्रात असते तर तेथील सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांच्या संशोधनाचा वापर करून घेतला असता. त्यांना मानसन्मान दिला असता. संशोधकांची उपेक्षा करण्याची कृती ठासून भरलेल्या सरकारी यंत्रणेला सरळ करण्याचे काम या नेत्यांचे नाही तर कुणाचे आहे? आता दादाजीच्या नावाने गळा काढणारे हे नेते कधी त्यांना पंजाबराव कृषी विद्यापीठात तरी घेऊन गेले का? त्यांच्याजवळ उपचारासाठी पैसे नव्हते, हे कळल्यावर सुद्धा एकाही वैदर्भीय नेत्याला आर्थिक मदत करावी असे का वाटले नाही? आता राहुल गांधींच्या भेटीनंतर काँग्रेसच्या नेत्यांकडून दादाजीच्या कुटुंबीयांवर आर्थिक मदतीचा वर्षांव सुरू झाला असला तरी दादाजी मौल्यवान रत्न आहे, ते वाचायलाच हवेत यासाठी तेव्हा आर्थिक भार उचलण्याची तयारी यापैकी कुणी का दाखवली नाही? दादाजी जिवंत असताना नागपूरचे आमदार डॉ. मिलिंद माने यांनी त्यांच्यावरील अन्याय दूर व्हावा म्हणून बरीच धावपळ केली. माने आमदार नव्हते तेव्हाची ही गोष्ट आहे.   आपल्या भागातील गुणवंत माणसे मोठी झाली तर विदर्भाचेच नाव होईल, हेही या नेत्यांना कळू नये, यातच वैदर्भीयांचे अपयश दडले आहे. दादाजीवर केवळ सरकारांनीच अन्याय केला नाही तर शेती व्यवसाय साखळीतील व्यापारी या घटकाने सुद्धा अन्याय केला. दादाजीचे एचएमटी हे वाण रामाच्या नावाने विकून मोठे झालेले अनेक व्यापारी विदर्भात आहेत. या व्यापाऱ्यांची अशी हिंमत झाली, कारण दादाजीच्या पाठीशी वैदर्भीय नेतृत्व उभे नव्हते. ते एकटे होते. नेत्यांनी केवळ समर्थकांच्या पाठीशी उभे राहून चालत नाही. आपल्या प्रदेशाला समोर न्यायचे असेल तर संशोधक, शास्त्रज्ञ, वेगवेगळ्या क्षेत्रात नाव कमावण्याची क्षमता असलेल्यांच्या मागे ठामपणे उभे राहावे लागते. प्रदेशाची क्षमता, ताकद याची ओळखयातून होत असते. नेत्यांनी राजकारण जरूर करावे. तो त्यांनी निवडलेला प्रांत आहेच, पण अशी गुणवंत माणसे शोधून त्यांना मोठेपण दिले तरच प्रदेश खऱ्या अर्थाने समृद्ध होत असतो. वैदर्भीय नेतृत्व हे कधी शिकणार? दादाजीचे संशोधन महाराष्ट्र भूषणच्या तोडीचे होते. त्यांच्या वाणांनी लाखो शेतकऱ्यांना समृद्ध केले. अतिसंकटात असलेल्या एका क्षेत्राला त्यांच्या संशोधनामुळे मदतच झाली, पण एकाही वैदर्भीय नेत्याला या पुरस्कारासाठी दादाजीची शिफारस करावीशी वाटली नाही. सध्याचे सरकार तर विदर्भाविषयी आस्था बाळगण्याचा सतत दावा करणारे आहे. त्यातील मंडळींना सुद्धा पुरस्काराचे पाऊल उचलावे असे कधी वाटले नाही. आता ते गेल्यानंतर त्यांचे स्मारक उभारू, असे म्हणणे पश्चातबुद्धी नाही तर मतांवर डोळा ठेवून केलेली घोषणा आहे. त्याला राजकीय स्पर्धेची किनार आहे. जन्मभर ज्याची उपेक्षा केली त्याला मरणानंतर देवत्व बहाल करण्याचा हा प्रकार निव्वळ राजकारणासाठी आहे. जन्माचे ठिकाण  कुणालाही मागून मिळणारी गोष्ट नाही. हे ठरवणे कुणाच्या हातातही नाही. दादाजींच्या दैवाचे फासे या बाबतीत भलेही उलटे पडले असतील, पण त्यांनी केलेले काम अस्सल होते. त्याला प्रोजेक्ट करण्याची जबाबदारी विदर्भातील नेत्यांवर होती. सरकारांमध्ये मोठय़ा पदावर असणाऱ्या या भागातील अधिकाऱ्यांवर होती. विदर्भाविषयी आस्था बाळगणाऱ्या सर्वावर होती. ती पार पाडण्यात अनेकजण अपयशी ठरले हे कटू सत्य सध्या सुरू असलेल्या राजकारणाला पाश्र्वभूमीवर समोर आणणे गरजेचे आहे. उर्वरित महाराष्ट्र व विदर्भात नेमका फरक कुठे, या प्रश्नाचे उत्तर शोधायला गेले की अशी उदाहरणे जागोजागी सापडत जातात. या वृत्तीचा त्याग जोवर वैदर्भीय करणार नाही, तोवर केवळ संशोधकांचीच नाही तर प्रत्येक क्षेत्रातील प्रतिभावंतांची उपेक्षा होत राहील, हे वास्तव आहे.

devendra.gawande@expressindia.com

First Published on June 14, 2018 1:34 am

Web Title: farmer scientist dadaji khobragade