अवकाळी पावसामुळे विदर्भात सर्वच पिकांची नासाडी झाली आहे. केंद्र सरकारला या विषयाचे गांभीर्य असेल का, याबाबत शंका आहे. म्हणून संकटातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून मी केंद्र सरकारला साकडे घालणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी दिली.

पवार दोन दिवसांच्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी गुरुवारी दिवसभर नागपूर जिल्ह्य़ातील काटोल, कामठी आणि कुही तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीकहानीची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच शुक्रवारी सकाळी विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्य़ातील निवडक शेतकऱ्यांची बैठक नागपुरातील शासकीय विश्रामगृह रविभवन येथे बोलावून त्या-त्या जिल्ह्य़ातील पीकहानीची माहिती घेतली. तसेच त्यांनी नुकसान भरपाईसंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी प्रेस क्लब येथे पत्रकारांशी संवाद साधला.

विदर्भातील संत्री, कापूस, धान, सोयाबीन या प्रमुख पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पीक गेले आणि बँकेचे कर्ज डोक्यावर आहे. शेतकऱ्यांनी कर्ज फेडायचे कसे, असा प्रश्न आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी

आपले प्रयत्न राहणार आहेत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. तसेच पुढील वर्षी पीक लागवडीसाठी शेतकऱ्यांना भांडवल उभारण्यासाठी मदत करणे गरजेचे आहे. यासंदर्भात केंद्रीय कृषीमंत्री आणि अर्थमंत्री यांची भेट घेईन. तसेच राज्यातील प्रमुख नेत्यांची आणि कृषीमंत्र्यांच्या बैठकीसाठी प्रयत्न केले जातील, असेही पवार यांनी सांगितले.

सरकारी आकडेवारीपेक्षा अधिक नुकसान

जिल्हाधिकाऱ्यांनी २० ठिकाणी सव्‍‌र्हे केला आणि ३३ टक्क्यांच्यावर ज्यांचे नुकसान झाले, त्यांची आकडेवारी सादर केली. अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा व्यापक अंदाज येण्यासाठी सरसकट पंचनामे झाले पाहिजेत, तेव्हाच नुकसानीचे गांभीर्य कळेल आणि त्यानुसार नुकसान भरपाईची रक्कम ठरवता येईल. सरकारी आकडेवारीपेक्षा कितीतरी अधिक नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे. आम्ही सरकारमध्ये असताना २०१२ मध्ये अशाचप्रकारे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यावेळी आम्ही ३० हजार प्रतिहेक्टर नुकसान भरपाई दिली होती. आता महागाई वाढली आहे. त्याचा विचार करून शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मदत करायला हवी, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून भेटणार काय, असे विचारले असता कृषीमंत्री आणि अर्थमंत्री यांना भेटून आर्थिक मदत मिळण्याचा प्रयत्न करेन. तेथे हा प्रश्न मार्गी न लागल्यास पुढचा विचार केला जाईल, असेही पवार यांनी सांगितले.