X

कीटकनाशकातून विषबाधा, विदर्भात ३१ मृत्यू

मृत्यूसंख्येत खासगी रुग्णालयांतील आकडय़ांचा समावेश नाही.

मेडिकलमधील ४ मृत्यूंवर शिक्कामोर्तब

कीटकनाशक फवारणीतून झालेल्या विषबाधेमुळे विदर्भातील ६ जिल्ह्य़ांत ३१ मृत्यू झाल्याचे गुरुवारी विदर्भातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतील तपासणीत पुढे आले आहे. मेडिकलमध्ये दगावलेल्या २५ पैकी ४ जण फवारणीतील विषबाधेमुळे दगावले यावर बुधवारी शिक्कामोर्तब झाले. मृत्यूसंख्येत खासगी रुग्णालयांतील आकडय़ांचा समावेश नाही.

विदर्भातील यवतमाळ जिल्ह्य़ात कीटकनाशकाच्या फवारणीतून झालेल्या विषबाधेतून १९ शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. १९ पैकी १० रुग्ण यवतमाळच्या शासकीय रुग्णालयातील तर इतर रुग्ण खासगी रुग्णालयांतील आहेत. त्यानंतर नागपूरच्या मेडिकलमध्ये १ सप्टेंबर ते आजपर्यंत कीटकनाशकाच्या विषबाधेमुळे २५ व मेयोमध्ये ४ मृत्यू अशा २९ रुग्णांचा मृत्यू झाला. यापैकी मेडिकलमधील चार जणांचा मृत्यू कीटकनाशक फवारणीतून विषबाधा झाल्याने झाला, असे वैद्यकीय तपासणीतून स्पष्ट झाले. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनीही यावर शिक्कामोर्तब केले.  मेडिकलमधील विषबाधित मृतांमध्ये रामेश्वर गिरी (मवाळी, पारशिवनी, नागपूर), प्रभाकर मिसाड (धामनगाव वाडी, भिवापूर, नागपूर) या नागपूर जिल्ह्य़ांतील दोन आणि रमेश प्रधान (लाखांदूर), शुभांगी वांगे (भंडारा) या भंडारा जिल्ह्य़ांतील दोघांचा समावेश आहे. दरम्यान, अकोलाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतही तब्बल ८ रुग्णांचा अशाच प्रकारे मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे. यात अकोला जिल्ह्य़ातील ५, अमरावती जिल्ह्य़ातील २, बुलढाणा जिल्ह्य़ातील एका रुग्णाचा समावेश आहे. यवतमाळ वगळता इतर कुठल्याही जिल्ह्य़ातील खासगी रुग्णालयांतील कीटकनाशक फवारणीची माहिती अद्याप पुढे आली नाही. त्यामुळे ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, मेयोत कीटकनाशक फवारणीच्या विषबाधेचे तीन रुग्ण उपचाराकरिता आले असले तरी एकही मृत्यू नसल्याचा प्रशासनाचा दावा आहे. या माहितीला एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दुजोरा दिला आहे.

Outbrain