अडतिया व व्यापाऱ्यांमधील तिढा कायमच
कळमना बाजारात शनिवारी सकाळी शेतकऱ्यांचा भाजीपाला येताच तो अडतियांकडून खरेदी करण्यास व्यापाऱ्यांनी नकार दिला. मात्र, भाजीपाला झटपट विकल्या गेला नाही तर त्याची खरेदी करणार कोण? म्हणून शेतकऱ्यांनी अडतियांना तो घेण्याची विनंती केली. मात्र, अडतियांकडून माल विकत घेणार नाही, यावर ठाम असलेल्या व्यापाऱ्यांच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना उरलेला ५० टक्के माल बाजारपेठेतून परत घेऊन जावा लागला.
कळमना बाजार समितीतील अडतिया व व्यापाऱ्यांमधील तिढा अजूनही सुटलेला नाही. मालाला नियंत्रणमुक्त केल्याच्या विरोधात कळमना बाजारपेठेतील प्रश्न कायम आहे. बाजारपेठ समित्यांनी संप मागे घेतला असला तरी व्यापाऱ्यांनी अडतियांकडून माल विकत घेण्यास नकार दिल्याने शनिवारी जवळपास निम्मा माल विकला नाही. त्यामुळे भाज्यांची विक्री कमी प्रमाणात झाली. हिरव्या पालेभाज्या खराब होण्याच्या भीतीने शेतकऱ्यांनी पडत्या भावात मालाची विक्री केली. नेहमीप्रमाणे कळमना बाजारपेठेत पहाटे ४ वाजता फळे-भाजीपाला येण्यास सुरुवात झाली. सकाळी ६ वाजताच्या सुमारस बाजार तेजीत असताना काही व्यापाऱ्यांनी अडतियांकडून माल विकत घेण्यास विरोध दर्शविला. मात्र, शेतकऱ्यांनी अडतियांना माल ठरलेल्या भावात विकत घेण्यासाठी आग्रह केला. व्यापाऱ्यांनी अडतियांपासून माल विकत घेण्यास नकार दिल्याने अडतियांनी देखील माल विकत घेतला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. सकाळी विक्रीची मुख्य वेळ निघून गेल्यास हिरव्या भाजीपाल्याचे दर उतरतात. अखेर शेतकऱ्यांनी पडत्या भावात मालाची विक्री केली.

आम्ही मागील अनेक वर्षांपासून या व्यावसायात आहोत. हा व्यासाय अगदी सुरळीतपणे सुरू असताना सरकारने यात हस्तक्षेप करून व्यापारी, अडतियांसोबतच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. जेव्हा शेतकरी अडचणीत असतो त्याला बियाणे किंवा फवारणीसाठी पसा लागतो तेव्हा आम्हीच त्यांची गरज भागवतो तेव्हा सरकार कुठे असते. अडतिया हे शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करतात. बाजारात माल येताच. आम्ही शेतकऱ्यांना चुकारा लगेच देतो. गाडीचे भाडे देतो. आज शेतकरी आमच्या बाजूने ठाम उभा आहे. तो अडतिया देण्यास तयार आहे. मात्र, सरकार आमच्यात आणि शेतकऱ्यांमध्ये अंतर निर्माण करून व्यापाऱ्यांचे गल्ले भरत आहे. आज शेतकऱ्यांचा अर्धा भाजीपाला विकला गेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, याचा विचार सरकार करीत आहे का?
– नंदकिशोर गौर
अध्यक्ष, युवा अडतिया सबजी असोसिएशन कळमना बाजार, नागपूर</strong>