चंद्रशेखर बोबडे

राज्यात यंदा दोन ते तीन जिल्ह्य़ांचा अपवाद वगळता सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टीने पिके हातची गेली आहेत. राज्यातील विभागनिहाय स्थितीचा हा आढावा…

हंगामाच्या सुरुवातीपासूनच बियाणे टंचाई, बोगस बियाणांची विक्री, पीक कर्जाचे अत्यल्प वाटप अशा संकटांना तोंड देणाऱ्याला विदर्भातील शेतकऱ्याला परतीच्या पावसाचा फटका बसला. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत निम्मेच पीक हाती येण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे.

वेळेत पाऊस आल्याने यंदा या भागात खरिपाच्या हंगामाला सुरुवात चांगली झाली. मात्र पहिला झटका पीक कर्जाच्या स्वरूपात बसला, वाटप अद्यापही ५० टक्के झाले नाही. उसनवारी करून बियाणे खरेदी केले तर ते बोगस निघाले. विदर्भातील ४५ हजार शेतकऱ्यांनी याबाबत सरकारकडे तक्रारी केल्या. काही ठिकाणी बियाणे उगवलीच नाही. परिणामी  सुमारे १५ ते २० हजार हेक्टरमध्ये पुन्हा पेरणी करावी लागली. टाळेबंदीच्या  नावाखाली खत टंचाई झाली. व्यापाऱ्यांनी किमती वाढवून शेतकऱ्यांची लूट केली. यातून आहे त्या स्थितीतील पीक जगवत ते बाजारात नेण्याचे स्वप्न शेतकरी रंगवत असतानाच  परतीच्या पावसाने घात केला. सरासरी ३० ते ४० टक्के पिकांना फटका बसल्याचा कृषी खात्याचा अंदाज आहे.  अतिवृष्टीमुळे पश्चिम विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यातील १० लाख हेक्टर वरील कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव  झाला. सोयाबीन पावसाने भिजल्याने त्याची प्रत खराब झाली. काही भागात त्याला कोंब फुटली. मूग, उडीद या पिकांची स्थिती यापेक्षा वेगळी नाही.

महापुराने हजार कोटीचे नुकसान

पूर्व विदर्भात महापुराने घात केला. गेल्या १०० वर्षांत आला नाही अशी या पुराची तीव्रता होती, असे महसूल खात्याने केंद्राला कळवले. याची जबर किंमत या भागातील शेतकऱ्यांना चुकवावी लागली. सहा जिल्ह्य़ातील ८८ हजार हेक्टरवरील पीक हानी झाली. सुमारे पाच हजार हेक्टर शेतजमीन पुराच्या पाण्याने खरडून गेली, यांचा सर्वाधिक फटका गोंदिया, भंडारा या भातपीक घेणाऱ्या जिल्ह्य़ांसह नागपूर जिल्ह्य़ालाही बसला. या भागाचा केंद्रीय पथकाने नुकताच दौरा केला. त्यांनीही धान पिकाची मोठी हानी झाल्याचे मान्य केले. विदर्भात एक पट्टा संत्री उत्पादकांचा आहे. त्यात अमरावती,वर्धा, नागपूर जिल्ह्यांचा समावेश होतो. अधिक पावसामुळे बागांमध्ये फळगळती सुरू झाली.  या सर्वाच्या नुकसानीचा एकूण आकडा एक हजार कोटींमध्ये जातो. त्यात सातशे कोटींची हानी एकटय़ा पूर्व विदर्भातील आहे.

यंदा निसर्गाने वेळेत पाऊस पाडून साथ दिली असली तरी अवेळी बरसून घातही केला आहे. विदर्भात पावसाची सरासरी ९५५ मि.मी. आहे. पण त्यात सातत्य नाही. यंदा पूर्व विदर्भात सरासरीच्या ९० टक्के पाऊस पडला तर हेच प्रमाण पश्चिचम विदर्भात १०५ टक्के आहे. हवामान खात्याच्या नोंदीनुसार विदर्भातील अकरापैकी ९ जिल्ह्यांनी पावसाची सरासरी ओलांडली.अकोला व यवतमाळ जिल्ह्यात पावसाची अनुक्रमे २३ ते २८ टक्के तूट होती. पण ती काही प्रकरणात भरून निघाली. पुढच्या काळात कृषी मालाच्या बाजारपेठांचा प्रश्न करोनाच्या साथीमुळे निर्माण होणार आहे.