फवारणी करताना दक्षता घेतली नसल्याचा कृषी खात्याचा दावा

शेतकऱ्यांनी कीटकनाशक फवारणी करताना दक्षता न घेतल्याने त्यांना विषबाधा झाल्याचे सांगून कृषी विभागाने शेतकरी, शेतमजुरांच्या मृत्यूला ते  जबाबदार असल्याचे म्हटले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कृषी विभागाने एक प्रसिद्ध पत्रक जारी केले. त्यात विषबाधेसाठी शेतकऱ्याला जबाबदार धरण्यात आले आहे. कीटकनाशकाने विषबाधा झाल्यामुळे नागपूर जिल्ह्य़ासह विदर्भातही अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

विदर्भात यवतमाळ, नागपूर, भंडार जिल्ह्य़ांसह इतरही भागात कीटकनाशकाच्या फवारणीतून विषबाधा होऊन तीसपेक्षा अधिक शेतकरी दगावले आहेत. जुलै महिन्यांपासून या घटना घडत आहेत. मात्र, यवतमाळ जिल्ह्य़ात याची तीव्रता अधिक असल्याने सरकार तेथील घटनेनंतर खडबडून जागे झाले. कृषी विभागाने आता पत्रक काढून या प्रकरणातून स्वत:ची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांनी शिफारसीपेक्षा जास्त मात्रेची फवारणी केली. विविध कीटकनाशकांचे मिश्रण एकत्र करून फवारणी केली. पॉवर स्प्रेअरचा वापर करताना सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. खाण्यापिण्याच्या सवयीबद्दल दक्षता न घेतल्याने मृत्यूच्या घटना घडल्या आहेत, असा दावा या पत्रकातून करण्यात आला.

नागपूर जिल्ह्य़ात २०१७-१८ च्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार कीटकनाशके तसेच बियाणे उपलब्ध व्हावे म्हणून विभाग पातळीवर १, जिल्हा पातळीवर १, तालुका पातळीवर १३ अशी एकूण १५ दक्षता पथकाची स्थापना केली होती.

या पथकामार्फत कीटकनाशकाचे एकूण ११५ नमुने घेतल्याचे कळवले आहे. नागपूर जिल्ह्य़ात कृषी साहित्य विक्री केंद्राच्या तपासण्या करण्यात आल्या असून ४७ विक्री केंद्र बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.