आडवळणाने नवीन सावकारीचा जन्म

नागपूर : हंगामाच्या काळात शेतकऱ्यांना उधारीवर बी-बियाणे द्यायचे आणि त्याची वसुली पीक निघाल्यावर म्हणजे चार ते सहा महिन्यानंतर करायची हा वरवर  शेतकरी आणि कृषी विक्रेते यांच्यांतील सामंजस्याने झालेला व्यवहार वाटत असला तरी उधारीवर दिलेल्या कृषी साहित्यासाठी विक्रेते अधिक दर लावत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत.

एकप्रकारे हा आडवळणाने केलेला सावकारीचाच प्रकार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सावकार दिलेल्या पैशावर मनमानी व्याज आकारतो तर विक्रेते अधिक दर आकारून चार महिन्यांचे एकप्रकारे व्याजच वसूल करतात, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

नागपूर जिल्ह्य़ात एक हजार ते पंधराशे विक्रेते आहेत. खरीप हंगामाच्या काळात छोटय़ा विक्रेत्यांचा पाच ते सात लाखाचा तर मोठय़ा विक्रेत्यांचा पन्नास ते साठ लाखांचा व्यवसाय फक्त चार महिन्यात होतो. निर्धारित दरानुसारच बी-बियाणे, खत-कीटकनाशकांची विक्री करावी, कृषी साहित्याचे दरपत्रक दुकानाच्या अग्रणी भागात लावावे, असे शासनाचे नियम आहे. उधारीवर घेणाऱ्यांना वेगळी तर रोखीने घेणाऱ्यांसाठी वेगळी किंमत आकारली जाते. रोख आणि उधारीवरील किंमतीचा फरक हा २० ते ३० टक्के इतका प्रचंड असतो.

सामान्यपणे शेतकरी त्यांच्या गावाजवळील किंवा तालुक्याच्या ठिकाणी नेहमीच्या कृषी विक्रेत्यांकडून कृषी साहित्य खरेदी करतात. खरेदी केलेल्या एकूण रक्कमेच्या निम्मी रक्कम देऊन उर्वरित रक्कम पीक निघाल्यावर म्हणजे दिवाळीत देण्याची कबुली असते. अशाप्रकारे खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ही ६० ते ७० टक्के आहे. या संपूर्ण प्रकरणात छापील किंमतीचा  घोळ शेतकऱ्यांच्या लुटीस कारणीभूत ठरला आहे. या  किंमतीवर कोणाचेच नियंत्रण नाही. ३५० रुपयांच्या कीटकनाशकावर एमआरपी ७०० रुपये लिहिली असते. तेच  कीटकनाशक रोख स्वरूपात खरेदी केले तर ४५० ते ५०० रुपयाला विकले जाते. कंपन्यातूनच एमआरपी वाढवून पाठवली जाते. निम्म्या किंमतीत जरी विकले तरी विक्रेता फायद्यात असतो. यावरून छापील किंमतीचे गौडबंगाल कळते.

उधारीवर साहित्य घेणाऱ्यांना एमआरपीनुसार दर लावले जाते. कारण ते मूळ किंमतीच्या दुप्पट असते. ही  एकप्रकारची व्याज आकारणीच असल्याचे शेतकरी सांगतात. काही विक्रेते यावरही तीन ते पाच टक्के व्याज आकारतात. शेतकऱ्यांची निकड असल्याने ते याला विरोध करीत नाहीत. विशेष म्हणजे, याचा कुठेच कागदोपत्री उल्लेख नसतो. सर्वाधिक लूट ही कीटकनाशकांच्या विक्रीतून व त्यानंतर व खतांच्या काही प्रकारांवर होत असल्याचे आढळून आले.

यासंदर्भात विभागीय कृषी गुणवत्ता नियंत्रक श्री. पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जास्त दराने कृषी साहित्याची विक्री करणाऱ्यांना प्रथम समज व नंतर पुन्हा तक्रार आल्यास कारवाई केली जाते, असे सांगितले. असे काही प्रकार होत असेल तर शेतकऱ्यांनी देयकासह तक्रार करावी.

शेतकरी संघटनेचे नेते व शेतकरी राम नेवले म्हणाले, पूर्वी कंपन्या विक्रेत्यांना उधारीवर माल द्यायचे. आता त्यांनी बंद केले. आधी

पैसे घेऊन नंतर माल दिला जातो. त्यामुळे विक्रेत्यांची रक्कम गुंतून पडते. त्यामुळे त्यांना उधारीवर माल देणे परवडत नाही, एमआरपी ही मुळातच अधिक असल्याने उधारीवर माल घेणाऱ्या शेतकऱ्यांना त्यानुसार विक्री केली जाते. बाजारात

प्रचंड स्पर्धा असल्याने अनेकदा विक्रेत्यांना काही वाण एमआरपीपेक्षा कमी दरात विकावे लागते. अशावेळी ही भरपाई दुसऱ्या माध्यमातून करण्याचा विक्रेत्यांचा प्रयत्न असतो.

नागपूर डिस्ट्रिक्ट अ‍ॅग्रो डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष विजय लोहिया म्हणाले, शंभर विक्रे त्यांतून एखाद, दुसरा विक्रे ता असा प्रकार करीत असावा. शेतकरी आणि विक्रे त्यांचे संबंध हे कौटुंबिक असतात. त्यामुळे त्यांची लूट होते, असे म्हणणे चुकीचे आहे. मुळात कृषी साहित्याच्या अनेक प्रकारांवर विक्रे त्यांना खूपच कमी पैसे मिळतात. ते विकायलाही परवडत नाही.