विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेले भंडारा जिल्ह्य़ातील साकोलीचे काँग्रेस आमदार नाना पटोले यांचा राजकीय प्रवास शेतकरीपुत्र, भूमिपुत्र ते विधानसभाध्यक्ष असा संघर्षमय आहे. शेतकरी आणि ओबीसीच्या मुद्दय़ांवर रोखठोक भूमिका मांडणारे नेते म्हणून ते प्रसिद्ध आहेत.

पटोले यांच्या कारकीर्दीला विद्यार्थीदशेपासून सुरुवात झाली. साकोली येथील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना ते एनएसयूआयमध्ये सक्रिय होते. त्यांनी १९९० मध्ये भंडारा जिल्हा परिषदेची (सावडी सर्कल) निवडणूक लढवली व जिंकली. १९९५ मध्ये लाखांदूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. मात्र त्यात ते पराभूत झाले. त्यानंतर १९९९ मध्ये त्यांनी काँग्रेसकडून  विधानसभा निवडणूक लढवून पहिल्यांदा आमदार झाले. २००४ च्या निवडणुकीत त्यांनी दुसऱ्यांदा ही जागा राखली. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वपक्षीय तत्कालीन सरकारशी मतभेद झाल्यावर त्यांनी २००८ मध्ये काँग्रेस सोडली. त्यानंतर एकच वर्षांने म्हणजे २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते अपक्ष लढले. त्यांच्या विरोधात तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल रिंगणात होते. त्यांनी जोरदार लढत दिली. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना साकोलीतून उमेदवारी दिली व ते विजयी झाले. पाच वर्षे ते भाजपमध्ये राहून शेतकरी व इतर मागासवर्गीयांच्या प्रश्नावर आंदोलन करीत होते. २०१४ मध्ये त्यांना भाजपने भंडारा-गोंदिया मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिली. यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांचा दीड लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. मात्र तीनच वर्षांत त्यांचे शेतकऱ्यांचे प्रश्न आणि ओबीसींच्या मुद्दय़ांवरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मतभेद झाले. त्यानंतर त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसने त्यांना नागपूर येथून भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात मैदानात उतरवले. येथेही त्यांनी गडकरी यांना जोरदार टक्कर दिली. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत साकोलीतून त्यांना पराभूत करण्यासाठी भाजपने त्यांच्या विरोधात तत्कालीन राज्यमंत्री परिणय फुके यांना उमेदवारी दिली. पण या निवडणुकीत पुन्हा पटोले यांनी भाजपला धूळ चारली. पटोले यांचा राजकीय प्रवास काँग्रेस-भाजप-काँग्रेस असा संघर्षशील राहिला आहे. संघटनात्मक पातळीवरही त्यांनी काम केले.

रोखठोक भूमिका

नाना पटोले त्यांच्या रोखठोक भूमिकांसाठी ओळखले जातात. या कारणांवरूनच पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी मतभेद झाल्याने त्यांना प्रथम काँग्रेस व नंतर भारतीय जनता पक्षाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता विधानसभा अध्यक्ष झाल्याने त्यांना त्यांच्या मूळ स्वभावाला मुरड घालावी लागणार आहे.